सातारा : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सातारा जिल्हाध्यक्ष सुनील माने व माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांनी शनिवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची औंध येथे भेट घेतल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. लवकरच हे मातब्बर नेते हातात पुन्हा घड्याळ बांधणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत.
सातारा जिल्ह्यातील राजकीय वातावरण सध्या शांत वाटत असले, तरी अंतर्गत बऱ्याच कुरघोडी सुरू आहेत. एकेकाळी शरद पवारांच्यावर जीव ओवाळून टाकणारा हा जिल्हा आता नवीन राजकीय समीकरणे जुळवू पाहत आहे. सध्या जिल्ह्यात भाजपचे वारे जोरदार वाहत असून, अजितदादांची राष्ट्रवादीही जोमात आहे. झेडपी, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष अलर्ट झाले आहेत. जिल्ह्यात आपापली ताकद वाढवण्यासाठी व्यूहरचना आखल्या जात आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तर आपल्या औंध दौऱ्यात राजकीय साखर पेरणी करून सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीचा विस्तार करण्याचे धोरण राबवल्याचे दिसून आले.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे शनिवारी औंध दौऱ्यावर आले होते. सुनील माने यांनी अजित पवार यांची भेट घेवून काही वेळ चर्चा केली. त्यांच्या या भेटीची चर्चा जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात वाऱ्यासारखी पसरली. गेल्या काही महिन्यांपासून सुनील माने अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती. शनिवारी अजित पवार व सुनील माने यांच्या भेटीमुळे पक्षांतराच्या चर्चेला बळ मिळाले आहे. येत्या काही दिवसात सुनील माने कार्यकर्त्यांसमवेत अजित पवारांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.
सन 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. त्यावेळी सुनील माने हे अजित पवार यांचे निकटवर्तीय असल्याने ते त्यांच्यासमवेत जातील असा कयास पदाधिकाऱ्यांनी बांधला होता. तसेच कार्यकर्तेही अजित पवारांसमवेत जाण्याबाबतचा आग्रह धरत होते. मात्र सुनील माने यांनी खा. शरद पवार यांच्यासमवेतच राहणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर सुनील माने यांनी जिल्ह्यात शरद पवार गट ताकदीने बांधण्याचा प्रयत्न केला. मात्र दुसरीकडे सत्तेत नसल्याने शासनाकडून निधी मिळत नसल्याची भावना व्यक्त करताना त्यांनी विकासकामावर मर्यादा येत असल्याचे म्हटले होते. त्या हेतूनेच त्यांनी मुंबई येथे गेल्यावरही अनेकदा अजित पवार यांना भेटण्याचा प्रयत्नही केला होता.
नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे गणित डोळ्यासमोर ठेवून निवडणुकीपूर्वी अजित पवार यांच्या गटामध्ये सामील होण्याचा निर्णय सुनील माने यांनी घेतला असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर सुनील माने यांनी अजित पवार यांची औंध येथे भेट घेवून चर्चा केली. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत. सुनील माने यांचीच री ओढत माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांनीही औंध येथे अजित पवार यांची भेट घेतली आहे. त्यामुळे सुनील माने व प्रभाकर देशमुख यांच्या भेटीने सातारा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे.