तासवडे टोलनाका : तासवडे, ता. कराड येथील टोल नाक्यावर सातारा येथील एका कंदीपेढे वाल्याने ऐन दिवाळीत महामार्गाचे सिमेंट काँक्रिटचे गटर विनापरवाना तोडून रॅम्प तयार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. अगदी काही मीटरवरच तासवडे टोलनाका आहे. तसेच महामार्गाच्या देखभाल दुरुस्ती विभागाचे पेट्रोलिंग सुरू असते. परंतु, गटर फोडून रॅम्प करण्याचा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला नाही, याचे मोठे आश्चर्य आहे. दरम्यान घटना घडल्यानंतर महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी व टोल व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी धाव घेत कंदी पेढेवाल्या विरुद्ध पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
वराडे गावच्या हद्दीत नवीन टोलनाका सुरू करण्यात आला आहे. या ठिकाणीच पश्चिम बाजूला महामार्ग लगतच एमआयडीसीची हद्द व रस्ता आहे. टोलनाक्याच्या थोड्या अंतरावर एमआयडीसीचा रस्ता संपून मोकळी जागा आहे. या जागेबाबत एमआयडीसी व वराडे येथील स्थानिक शेतकरी यांचा अनेक दिवसांपासून कोर्टात वाद सुरू आहे. त्यामुळे सदरची जागा ही विना वापरा तशीच आहे.
दरम्यान, मंगळवारी सर्वजण दिवाळी साजरी करत असताना मात्र सातारा येथील वाढेकर बंधू कंदी पेढे वाल्याने एमआयडीसी व खासगी शेतकऱ्यांच्यात वाद असलेल्या मिळकतीत कंदीपेढ्याचे मोठे दुकान घालण्याचे काम सुरू होते. मंगळवार व बुधवारी उशिरा रात्रीपर्यंत हे काम सुरू होते. यावेळी बुधवारी रात्रीच्या सुमारास कंदीपेढेवाल्याने बेकायदेशीर रित्या महामार्गालगत नवीन बांधलेले सिमेंटचे गटर फोडले. गुरुवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर महामार्गाच्या व टोलव्यवस्थापनच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी सुमारे 50 फूट लांब सिमेंटचे काँक्रिटचे गटर दोन्ही बाजूंनी मशिनने फोडण्यात आले होते.
तसेच त्या फोडलेल्या गटरवरच महामार्गावरील वाहने थांबण्यासाठी रॅम्प केल्याचे दिसून आले. यावेळी अधिकाऱ्यांनी सदर प्रकाराबाबत वाढेकर बंधूंना विचारले असता त्यांनी टाळाटाळ केली. त्यानंतर महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी व टोल व्यवस्थापनच्या अधिकाऱ्यांनी तळबीड पोलिस ठाण्यात वाढेकर बंधू यांच्याविरुद्ध महामार्गाच्या गटरचे 6 लाख रुपये नुकसान केल्याबाबतची तक्रार दाखल केली आहे. दरम्यान स्वतःच्या व्यवसायासाठी महामार्गाचे गटर फोडून रॅम्प करण्याचे धाडस वाढेकर बंधूंनी कोणाच्या आशीर्वादाने केले, याची चर्चा घटनास्थळी सुरू होती. तसेच वाढेकर बंधूवर महामार्ग प्राधिकरण, पोलिस व एमआयडीसी प्रशासन कारवाई करणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
महामार्गाचे गटर बेकायदेशीर रित्या फोडून 6 लाख रुपयांचे महामार्ग प्राधिकरणाचे नुकसान केल्याबद्दल महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी तळबीड पोलिस ठाण्यात अर्ज दिला आहे. त्या अर्जाची चौकशी सुरू असून योग्य ती कारवाई केली जाईल.- किरण भोसले, पोलिस निरीक्षक, तळबीड पोलिस ठाणे.