सातारा : ग्रामीण भागात रोजगार हमी योजनेंतर्गत वैयक्तीक लाभासह सार्वजनिक कामांचा लेखाजोखा व समन्वयक म्हणून ग्रामरोजगार सेवक आपली कामगिरी बजावत आहेत. मात्र या ग्रामरोजगार सेवकांचे तब्बल पाच महिन्यांचे मानधन रखडले होते. मात्र शासनाकडून एप्रिल ते ऑगस्टअखेरचे मानधन प्राप्त झाल्याने ग्रामरोजगार सेवकांची दिवाळी गोड होणार आहे. दैनिक ‘पुढारी’च्या पाठपुराव्याला अखेर यश आल्याने रोजगार सेवकांच्या बँक खात्यात मानधन जमा करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. मानधनासाठी 1 कोटी 57 लाखाचा निधी प्राप्त झाला आहे.
महात्मा गाधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची जबाबदारी गावपातळीवर सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्यावर देण्यात आली आहे. या कामात ग्रामपंचायतस्तरावर अभिलेख आणि नोंदवह्या ठेवण्यासाठी मदत करण्याची आणि प्रत्यक्ष काम करण्यासाठी ग्रामरोजगार सेवकांची अर्धवेळ स्वरुपात नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी ग्रामरोजगार सेवकांना अकुशल कामावर मनुष्य दिवसाच्या खर्चावर आधारित मानधन देण्यात येत होते. मात्र शासनाने ग्राम रोजगार सेवकांना महिन्याला 8 हजार रुपये निश्चित मानधनाचा निर्णय घेतला. सातारा जिल्ह्यातील 11 तालुक्यात 1 हजार 302 ग्रामरोजगार सेवक कार्यरत आहेत. जिल्ह्यातील ग्रामरोजगार सेवकांना मार्चअखेर मानधन मिळाले आहे. मात्र एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या सहा महिन्याचे मानधन मिळाले नाही. त्यामुळे गावोगावी असणाऱ्या ग्रामरोजगार सेवकावर उपासमारीची वेळ आली आहे.
जिल्हा प्रशासनाने मानधनासंदर्भात शासनाकडे वेळोवेळी पत्रव्यवहार केला. मात्र कोणतीही कार्यवाही होत नसल्याने ग्रामरोजगार सेवक हताश झाले होते. याबाबत दैनिक ‘पुढारी’ने लेखाजोखा प्रसिध्द केला होता. दैनिक ‘पुढारी’ने केलेल्या पाठपुराव्यामुळे जिल्हा परिषदेच्या रोजगार हमी योजना विभागाकडे एप्रिल ते ऑगस्ट 2025 अखेर शासनाकडून 1 कोटी 57 लाखाचा निधी आला असून ग्रामरोजगार सेवकांना वितरीत करण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच्या सर्व 11 पंचायत समित्यांना पाठवण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामरोजगार सेवकांची दिवाळी आता गोड होणार आहे.