उंडाळे : कराड दक्षिणच्या डोंगरी भागात महसूल विभागातील मंडल अधिकारी व तलाठी नियुक्त गावात हजर राहत नसल्याने शेतकर्यांची मोठी कोंडी होत आहे. शेतकर्यांना आपली कामे सोडून तलाठी कार्यालयासमोर त्यांच्या येण्याची वाट पाहत दिवस काढावा लागत आहे. तरीही ते न येता दांडी मारत असल्याने या दांडी बहाद्दर कर्मचार्यांमुळे शेतकर्यांना नाहक त्रास सोसावा लागत आहे. याकडे तहसीलदार, प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी यासह वरिष्ठ लक्ष देणार का? असा संतप्त सवाल कराड दक्षिण विभागातील शेतकर्यांमधून विचारला जात आहे.
कराड दक्षिण डोंगरी विभागात यापूर्वी माजी मंत्री स्व. विलासराव पाटील (उंडाळकर) यांचा लोकप्रतिनिधी या नात्याने प्रचंड दबदबा होता. त्यामुळे विभागात सर्व गावात तलाठी, सर्कल यासह सर्व शासकीय कर्मचारी वेळेत हजर राहत होते. परंतु स्व. विलासराव पाटील उंडाळकर यांच्या निधनानंतर या विभागातील कर्मचारी व अधिकारी हे नोकरीसाठीचे नियुक्त ठिकाणी अचूक हजर राहत होते. परंतु सध्या बहुतांश कर्मचारी नियुक्त ठिकाणी न येता कराडत बसूनच आपले कामकाज करत आहेत. यामध्ये महसूल खात्याचे कर्मचारी वर्गाचा सर्वात वरती नंबर आहे.
कराड दक्षिण डोंगरी व दुर्गम भाग आहे. कराडपासून भूरभुशी, मट्टलवाडी, येणपे, चोरमारवाडी, येवती, घराळवाडी, जिंती, अकाईवाडी, लोहारवाडी, येळगाव ही गावे 40 ते 50 किलोमीटर अंतरावर आहेत. या सर्व गावात शासनाकडून तलाठी व सर्कल यांना नियुक्त गावे देण्यात आली आहेत. त्यांना त्यांची बसण्याची ठिकाणेही दिलेली आहेत. परंतु या सर्व गावात एकाही ठिकाणी शासनाने नेमून दिलेल्या वेळेत दररोज तलाठी किंवा सर्कल हजर नसतात. तलाठी सर्कल यांना शासनाने नियुक्त गावात आपली वेळ ठरवून दिली आहे.
त्याप्रमाणे संबंधितांचे वेळापत्रक त्यांच्या नियुक्ती ठिकाणी असणे गरजेचे आहे. परंतु या गावात त्यांची कामाची वेळ व कामाचे दर्शनी भागात वेळापत्रक असणे गरजेचे आहे. परंतु असे कोणतीही वेळापत्रक कोणत्याही तलाठी अथवा सर्कल कार्यालयात पहावयास मिळत नाही. त्यामुळे आपल्या कामकाजाला शेतीकामातून वेळ काढून शेतकरी जर महसूल कार्यालयात गेला तर त्या ठिकाणी तलाठी किंवा सर्कल भेटत नाहीत. परिणामी शेतकर्यांना तलाठी यांच्या आगमनाची वाट पाहत बसावे लागते. तरीही तलाठी येत नसल्याने हाताखालचा कर्मचारी ताठरपणाने वागत शेतकर्यांची आडवणूक करून आर्थिक पिळवणूक करत असतो. त्यामुळे शेतकर्याला आपले काम करून घेण्यासाठी दुसरा पर्याय नसल्याने मागेल तेवढी रक्कम द्यावी लागते.
कराड दक्षिण विभागात उंडाळे, येळगाव ही दोन महसूल मंडले आहेत. यापैकी येळगाव व उंडाळे मंडळात कार्यरत मंडल अधिकारी नियुक्त ठिकाणी कधीही हजर नसतात. ते कराडमध्ये रेव्हुन्यू क्लबमध्ये बसून आपले कामकाज करत असल्याचे चित्र आहे. त्यांनी आपली कार्यालये कराड येथेच थाटली आहेत. त्यामुळे विभागातील कामकाज ते कराडमध्ये बसून हाकत असतात. महसूल विभागातील काम असल्यास शेतकर्याने 50 ते 60 किलोमीटरचा प्रवास करून कराडला जावे लागते. कराडला गेल्यानंतर हे महाभाग जागेवर असतील असे नाही. ते इतरत्र भटकत असतात व विचारणा केली असता तहसीलदार, प्रांतांधिकारी, जिल्हाधिकारी मीटिंग यासह कारणे सांगत असतात. तलाठी सर्कल यांनी आपले सजात बसून कामकाज करावे, असे शासनाचे धोरण आहे.
शेतकर्यांना जागेवर व वेळेत सेवा देण्यासाठी ही कार्यालय आहेत. परंतु कराड तालुक्यात मात्र वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यांचा वचक प्रशासनावर नसल्याने उलटा कारभार सुरू आहे. शासन शेतकर्याच्या दारी असे शासनाचे ब्रीद आहे. परंतु कराड तालुक्यात मात्र शेतकर्यांनी शासन दारी यावे अशी उलटी गंगा वाहत येण्याचा प्रकार सुरू आहे. महसूल प्रशासनातील अधिकार्यांनी एखादा दुसरा दिवस तालुका जिल्हास्तरावर कामकाजात घालवला तर गैर नाही. परंतु महिन्यातील बहुतांश दिवस हे वरिष्ठांच्या मीटिंगच्या नावाखाली हे अधिकारी बाहेरच थांबतात आणि शेतकर्यांची कोंडी करतात. याबाबत त्यांना कोणी विचारणार आहे की नाही? याशिवाय कोणी शेतकर्यांनी विचारणा केली असता शेतकर्यांना हे तलाठी व सर्कल अर्वाच्य भाषा वापरून त्याची अवहेलना करतात, असा प्रकार सध्या सुरू आहे.
येळगाव विभागातील महिला सर्कल यांना टाळगाव ता कराड येथील शेतकरी सागर जाधव यांनी कामकाजा संदर्भात भेट घेत सर्कल यांना आपले व तलाठी यांचे कार्यालयीन कामकाजाचे वेळापत्रक कसे असते याबाबत विचारणा केली असता संबंधित महिला सर्कल यांनी सागर जाधव यांच्याशी उद्घट वर्तन करत तुम्हाला काय करायचे ते करा असे उत्तर दिले. या शेतकर्यांचा फोन नंबर ब्लॅकलिस्ट टाकला. संबंधित महिला सर्कलचे उद्धट संभाषण शेतकर्याने मोबाईलमध्ये कैद केले आहे. त्यामुळे या अधिकार्यांच्या व तलाठी गैरहजर संदर्भात शेतकर्यांच्या प्रश्नासाठी आपण लवकरच कराड दक्षिणचे लोकप्रतिनिधी आ. डॉ अतुल भोसले, जिल्हाधिकारी व महसूल मंत्री यांना लवकरच भेटणार आहे. याबाबत टाळाटाळ झाल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.