कोरेगाव : जयपूर, ता. कोरेगाव येथील शिवनेरी शुगर्स साखर कारखाना परिसरातील कार्यक्षेत्रात जयपूर येथील भाजप पदाधिकारी सोमनाथ कृष्णत निकम यांच्यावर कोयत्याने वार झाले. या घटनेत ते गंभीर जखमी झाले असून जमिनीच्या वादातून हा हल्ला झाल्याचे समोर येत आहे. या हल्ल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून संशयित पैलवान सचिन शेलार हा कोयता हातात घेऊन दिसत आहे. दरम्यान, रविवारी या घटनेनंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
दरम्यान, एकसळ येथील पैलवान सचिन शेलार याने व त्याच्या इतर साथीदारांनी हल्ला केल्याचा आरोप सोमनाथ निकम यांचे बंधू श्रीकांत निकम यांनी घटनास्थळी केलेल्या चित्रीकरणात केला आहे. रात्री उशीरापर्यंत रहिमतपूर पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झालेली नव्हती.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, जयपूर येथील भाजप पदाधिकारी सोमनाथ निकम यांची शिवनेरी शुगर्स कारखाना कार्यक्षेत्रालगत शेतजमीन आहे. या जमिनीवरून कारखाना व्यवस्थापन व सोमनाथ निकम यांचे कारखाना उभारणीपासून वाद सुरू आहेत. या वादातूनच संबंधित जागेवर कारखाना व्यवस्थापनाकडून काँक्रीट करण्याचे काम सुरू होते. रविवार, दि. 19 रोजी दुपारी याबाबतची माहिती मिळताच सोमनाथ निकम हे बंधू श्रीकांत निकम याच्याबरोबर कारखाना स्थळावर गेले.
निकम यांना त्यांच्या शेत जमीनमध्ये रस्ता होत असल्याचे दिसले. यामुळे सोमनाथ निकम यांनी आमच्या परवानगीशिवाय आमच्या जमिनीत तुम्ही काँक्रिटीकरण का करताय? अशी विचारणा कारखाना व्यवस्थापनाला केली. यातून कारखाना व्यवस्थापन व सोमनाथ निकम यांच्यात वाद झाला. या दरम्यानच एकसळ येथील पैलवान सचिन शेलार हे सहा ते सात जणांबरोबर घटनास्थळी आला. त्यातील एकाने श्रीकांत निकम यांना धरून ठेवले. दुसरीकडे सचिन शेलार याने सोमनाथ निकम यांच्या डोक्यात व शरीरावर अन्य ठिकाणी कोयत्याने वार केल्याने ते गंभीर जखमी होऊन जागीच खाली कोसळल्याचे जखमीचे भाऊ श्रीकांत निकम यांनी सांगितले. या घटनेने परिसरात तणाव निर्माण झाला.
सोमनाथ निकम यांना जखमी अवस्थेत कारमधून नेत असतानाच काही जणांनी त्या वाहनावर दगड मारल्याने गाडीचे नुकसान झाले. निकम यांच्यावर रहिमतपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करण्यात आले. जखमीला पुढील उपचारासाठी साताऱ्यात हलवण्यात आले आहे. दरम्यान, रविवारी घडलेल्या या घटनेने साप, वेळू, जयपूर, रहिमतपूर पंचक्रोशीसह कोरेगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.
न्यायालयाचे आदेश मोडून रक्षकाला जीवे मारण्याचा निकम यांचा प्रयत्न : शिवनेरी कारखाना प्रशासन
शिवनेरी शुगर्स व निकम यांचा जमीन हद्दीवरून वाद आहे. न्यायालयाने त्यांना कारखाना हद्दीत जाऊ नये व रस्ता अडवू नये, असे सांगितले आहे. मात्र, तरीही निकम यांनी रस्त्याचे काम सुरू असताना कामगारांना शिवीगाळ करत तोडफोड केली. कारखाना हद्दीत चर खोदून रस्ता अडवल्याची बाब सुरक्षा रक्षक सचिन शेलार यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांना अटकाव केला. यावेळी सोमनाथ व श्रीकांत निकम यांनी सचिन यांच्यावर कोयत्याने वार केले. त्यानंतर स्वत:च्या सुरक्षेसाठी त्यांच्याकडील कोयता काढून घेतला. याचवेळी श्रीकांत यांनी सचिन यांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
न्यायालयाचा आदेश मोडून निकम यांनी रस्ता अडवून सुरक्षा रक्षकाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच त्यांच्याकडूनच कारखान्याची बदनामी सुरू आहे. पुढील न्याय निवाडा न्यायालयात झाल्यानंतर जनतेला समजेल, असा खुलासा शिवनेरी कारखाना व्यवस्थापनाच्यावतीने देण्यात आला आहे. जयपूर येथे संशयिताने निकम यांच्यावर हल्ला केल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात पडले तर त्याच्या साथीदाराने त्यांच्या भावाला धरून ठेवले असल्याचे दिसत आहे. 19एसएटी39