Satara News | जिल्ह्यातील 97 लाडक्या बहिणी झाल्या आर्थिक सक्षम Pudhari Photo
सातारा

Satara News | जिल्ह्यातील 97 लाडक्या बहिणी झाल्या आर्थिक सक्षम

नोकरी, उत्पन्न वाढीमुळे सोडला लाभ; सातारा तालुक्यातील सर्वाधिक अर्ज

पुढारी वृत्तसेवा
मीना शिंदे

सातारा : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेस जिल्ह्यातील 7 लाख 98 हजार 768 महिला पात्र ठरल्या होत्या. त्यापैकी 97 लाडक्या बहिणींनी आर्थिक सक्षमतेच्या कारणास्तव स्वत:हून या योजनेचा लाभ सोडला आहे. जिल्हा व महिला बाल विकास विभागाकडे त्यांनी शासकीय नोकरी, उत्पन्न वाढ, इतर योजनांचा लाभ मिळाल्याने तर कुणाला चारचाकी घ्यायची असल्याने योजनेचा लाभ नको असल्याचा अर्ज केला आहे. यामध्ये सातारा तालुक्यातून सर्वाधिक 50 अर्जांचा समावेश आहे.

गरीब व गरजू महिलांना आर्थिकद़ृष्ट्या सक्षमतेसाठी शासनाने गतवर्षी जुलैमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. विधानसभा निवडणुका लागल्याने सरसकट सर्वांना लाभ देण्यात आला होता. त्यामुळे जिल्ह्यातील 7 लाख 98 हजार 768 महिला त्यास पात्रही ठरल्या होत्या. निवडणुकानंतर या अर्जांची छाननी केल्यानंतर चारचाकी वाहन नावावर असलेल्या लाडक्या बहिणी तसेच इतर शासकीय योजनांचा लाभ घेणार्‍या महिलांची नावे या लाभार्थ्यांमधून आपोआपच कमी झाली.

त्यानंतरही मे अखेरपर्यंत जिल्ह्यातील सातारा 50, कराड 14, खटाव 7, कोरेगाव 16, पाटण 7, फलटण 6, सातारा 50, वाई 2 या तालुक्यातील एकूण 97 महिलांनी स्वत:हून लाडकी बहीण योजनेचा लाभ नको असल्याचा अर्ज जिल्हा महिला व बाल विकास विभागाकडे केला आहे. लाडकी बहिण योजनेचा लाभ नाकारणार्‍यांमध्ये सातारा तालुक्यातील सर्वाधिक म्हणजे 50 महिलांनी योजनेचा लाभ नाकारला आहे. शासनाकडून चारचाकी वाहनांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून त्यामुळे जिल्ह्यातील 14 हजार 68 लाडक्या बहिणींचा लाभ बंद झाला आहे. शासनाकडून विविध विभागांद्वारे सत्यता पडताळणी सुरू केली आहे. त्यामुळे आयकर भरणार्‍या लाडक्या बहिणींमध्येही धास्ती वाढली आहे.

36 हजार जणींनी घेतला शासकीय योजनांचा डबल लाभ

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या सुधारित नियमावलीनुसार 1500 रुपयांपेक्षा जास्त लाभ घेणार्‍या महिलांना अर्ज भरता येणार होता. त्यामुळे शेतकरी सन्मान, संजय गांधी निराधार योजना, विधवा पेन्शन योजना लाभार्थ्यांनही लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरुन लाभ घेतला. शासकीय योजनांचा डबल लाभ घेणार्‍या 36 हजार 533 महिलांची नावे स्पष्ट झाली. शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेणार्‍या महिलांना 1000 रुपये मिळत असल्याने फेब्रुवारीनंतर लाडकी बहीण म्हणून त्यांच्या खात्यावर केवळ 500 रुपये जमा होत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT