तुपेवाडी: वरकुटे (ता. माण) गावच्या हद्दीत शहाजी दाजी तुपे (वय ६५, रा. तुपेवाडी वरकुटे) याने गांजाची शेती केल्याचा पर्दाफाश स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने (एलसीबी) व म्हसवड पोलिसांनी केला. पोलिसांनी संशयिताला अटक केली असून, १० लाखाचा सर्व मुद्देमाल जप्त केला आहे.
सातारा जिल्ह्यात अमली पदार्थ गांजाच्या झाडांची लागवड करून त्याची विक्री करण्याकरिता झाडांची जोपासना होत असल्याची माहिती एलसीबीला मिळाली. त्यानुसार एलसीबी व म्हसवड पोलिस माहिती घेत होते. दि. ९ ऑक्टोबर रोजी माण तालुक्यातील तुपेवाडी, वरकुटे येथील माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी तेथे शहाजी तुपे याने शेतात गांजाची झाडे लावली होती. तसेच गांजाची हिरवट पाने फुले, बारीक काड्या व बीज असलेली ओलसर पाने सुकत घातल्याचे मिळून आले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन म्हसवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी जप्त केलेला मुद्देमाल १० लाख ११ हजार ९५० रुपये किंमतीचा आहे.
पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, पोनि अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली, सपोनि रोहित फार्णे, म्हसवड पोलीस स्टेशनचे सपोनि अक्षय सोनावने, फौजदार विश्वास शिंगाडे, परितोष दातीर, अनिल वाघमोडे, पोलिस सनी आवटे, अमित सपकाळ, गणेश कापरे, स्वप्नील कुंभार, अमर नारनवर, शशिकांत खाडे, रुपाली फडतरे, अभिजीत बहाद्दले, राहुल थोरात, वसिम मुलाणी यांनी कारवाईत सहभाग घेतला.