सातारा : सातारा पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा बिगूल वाजल्याने इच्छुक उमेदवारांना उकळ्या फुटल्या आहेत. सातारा पालिकेच्या 25 प्रभागांच्या 50 नगरसेवकपदासाठी होणाऱ्या निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्यासाठी अनेकजण आतुर झाले आहेत. 10 नोव्हेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार असल्याने आपल्यालाच संधी मिळावी यासाठी अनेक इच्छुकांनी आपापल्या नेत्यांकडे लॉबिंग करायला सुरुवात केली आहे.
सातारा नगरपालिका निवडणुकीसाठी साताऱ्यातील सातारा विकास आघाडी तसेच नगर विकास आघाडीने जोरदार तयारी केली आहे. काहीही झाले तरी सातारा पालिकेवर पुन्हा सत्ता स्थापन करण्यासाठी दोन्ही आघाड्या सक्रिय झाल्या आहेत. साविआचे नेते खा. श्री. छ. उदयनराजे भोसले तसेच नविआचे नेते व राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी कार्यकर्त्यांना निवडणूक तयारीच्या सुचना केल्या आहेत. दोन्ही आघाड्यांसोबतच भाजपनेही रान उठवले आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांच्या माध्यमातून झालेली विकासकामे प्रभावी ठरणार आहेत. सातारा पालिकेचे 25 प्रभाग असून या प्रभागांमध्ये 50 नगरसेवकपदाच्या जागा आहेत. प्रत्येक प्रभागात सरासरी दहापेक्षा अधिक इच्छुक उमेदवार आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी ट्विस्ट निर्माण झाले आहे.
प्रभाग रचना व मतदार याद्या अंतिम झाल्यानंतर इच्छुकाचे घर एका प्रभागात तर दुसऱ्या प्रभागाच्या मतदार यादीत नाव आल्याने कोंडी झाली आहे. मात्र काहीजणांसाठी ही बाब पथ्यावर पडल्याचे दिसत आहे. कार्यक्षम, स्वच्छ प्रतिमेचा व नागरिकांच्या कामाचा उमेदवार देण्यात येणार असल्याचे दोन्ही नेत्यांच्या भूमिकेवरुन स्पष्ट होत आहे. नव्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.
या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी 10 नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. अर्ज भरण्याची मुदत 17 नोव्हेंबरपर्यंत आहे. त्यामुळे पुढील 12 दिवस इच्छुकांसाठी महत्त्वाचे आहेत. उमेदवारी अंतिम झाल्यानंतर प्रचारासाठीही खूप कमी वेळ असल्याने उमेदवारांची दमछाक होणार आहे. एकाच प्रभागात दोन नगरसेवकपदे असल्याने कार्यक्षेत्र वाढले आहे. त्यामुळे प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचताना उमेदवारांचा घामटा निघणार आहे. सातारा पालिकेत 25 महिला नगरसेविका निवडून दिल्या जाणार आहेत.
आरक्षण सोडतीत बऱ्याच मातब्बरांचे प्रभाग आरक्षित झाले. त्यामुळे संबंधित इच्छुकांकडून पत्नीला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. सातारा पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 1 लाख 47 हजार 112 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये पुरुष मतदार 73 हजार 45 तर स्त्री मतदार 74 हजार 31 तसेच इतर 36 मतदारांचा समावेश आहे. प्रभाग क्र. 1 मध्ये सर्वात कमी 3 हजार 672 तर प्रभाग क्र. 17 मध्ये सर्वाधिक 7 हजार 498 मतदार आहेत.