File Photo
सातारा

Satara News: लिंब गटात उमेदवारीसाठी कोलांट उड्या?

‘इकडून नाय जमलं तर तिकडून‌’चा इरादा : दोन्ही गणातही हीच रंगत

पुढारी वृत्तसेवा

बाळू मोरे

कण्हेर : सातारा तालुक्यातील लिंब जिल्हा परिषद गटासह लिंब व कोंडवे हे दोन्ही गणही खुले झाल्यामुळे इच्छुकांसाठी या गटात सर्वत्र खुल्लमखुल्ला वातावरण आहे. त्यामुळे अनेक इच्छुक गुडघ्याला बांशिग बांधून बसले असून निवडणूक लढवण्यासाठी जो तो बाह्या मागे सारुन सरसावला आहे. या गटावर ना. शिवेंद्रराजे भोसले यांचे वर्चस्व असल्याने त्यांच्याकडून उभे राहण्यासाठी मोठी रांग आहे. इच्छूक जास्त असले तरी उमेदवारी मात्र एकालाच मिळणार आहे. त्यामुळे काहीजणांची मदार महाविकास आघाडीवरही आहे. ‌‘इकडून नाय जमलं तर तिकडून‌’ असाच काहींचा इरादा असल्यामुळे उमेदवारीसाठी कोलांटउड्या घेतल्या जाणार असल्याचे चित्र आहे.

लिंब गटात लिंब व कोंडवे हे दोन गण येतात. गट व दोन्ही गण खुले झाल्याने येथील लढती अत्यंत चुरशीच्या होणार आहेत. लिंब गणात लिंब, कोंडवली, नागेवाडी, कुशी, नेले-किडगाव, पिंपळवाडी, धावडशी, कळंबे, माळ्याचीवाडी, आकले, गोगावलेवाडी, चिंचणी ही गावे येतात. तर कोंडवे गणात सैदापूर, कोंडवे, हमदाबाज, सारखळ, नुने, इंगळेवाडी, ठोंबरेवाडी, बेबलेवाडी, गवडी, साबळेवाडी, कण्हेर, जांभळेवाडी, चोरगेवाडी, जोतिबाचीवाडी, अहिरेवाडी, आगुंडेवाडी, आंबेदरे व वेळेकामथी ही गावी येतात.

गेल्या अनेक वर्षापासून लिंब गट व गणांवर ना. शिवेंद्रराजे यांचे वर्चस्व राहिले असून त्यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या मतदारसंघात ‌‘शिवेंद्रराजे म्हणतील तेच धोरण व बांधतील तेच तोरण‌’ असे वातावरण आहे. पूर्वीपासूनच हा मतदारसंघ बाबाराजेंचा बालेकिल्ला आहे. परंतु या गटातील काही गावांवर खा.श्री.छ. उदयनराजे भोसले यांचीही पकड असून त्यांनाही मानणारे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे दोन्ही राजांच्या शिलेदारांना मतदारसंघात लढताना समन्वय ठेवावा लागणार आहे. दोन्ही राजांचे मनोमीलन होणार असल्याचे ग्राह्य धरुन काहींनी फिल्डिंग लावली आहे. प्रत्यक्षात या दोन्ही राजेंची भूमिका काय राहणार, हे पाहणे अत्यंत महत्वाचे ठरणार आहे.

पूर्वी हा गट जावली विधानसभा मतदारसंघात होता. त्यामुळे आ.शशिकांत शिंदे यांचेही काही गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्राबल्य आहे. लोकसभा निवडणुकीवेळी आ.शशिकांत शिंदे यांनी गावांना भेटी देऊन सुमारे 30 टक्के गावात चांगले मतदान घेतले होते. या बाबीही दुर्लक्षित करता येणार नाहीत. त्यामुळे आ. शशिकांत शिंदे काय भूमिका घेणार, हेही तितकेच महत्वाचे ठरणार आहे. महाविकास आघाडी म्हणून त्यांनी मोट बांधली तर या गटात व दोन्ही गणातही निकराची लढाई होवू शकते.

गट व दोन्ही गण खुले झाल्याने मातब्बर इच्छुकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. सर्वत्र इच्छुकांची चुळबूळ वाढली असून पूर्वीच्या आरक्षणामधील ओबीसी प्रवर्गातील इच्छुकांना ‌‘दे धक्का‌’ बसला आहे. खुल्या गट व गणांमुळे इच्छुकांची मांदियाळी होणार आहे. परिणामी या मतदारसंघातील उमेदवार निवडताना बाबाराजेंची कसोटी लागणार आहे. माजी अर्थ व शिक्षण सभापती कै. प्रल्हादभाऊ चव्हाण यांचे चिरंजीव राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप चव्हाण यांचाही कोंडवे गणात संपर्क असल्याने त्यांच्याही भूमिकेकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

लिंब गटात सुमारे 45 हजार इतके मतदार असून दोन्ही गणात प्रत्येकी 20 ते 22 हजार मतदार आहेत. या गटातून भाजपा तालुकाध्यक्ष महेश गाडे, उदयनराजेंचे समर्थक लक्ष्मण कडव, बाळासाहेब चोरगे, पै. निलेश पाटील, अजिंक्यतारा कारखान्याची माजी चेअरमन सर्जेराव सावंत, कारखान्याचे व्हा. चेअरमन नामदेव सावंत, माजी सरपंच ॲड. अनिल सोनमळे, जितेंद्र सावंत, माजी सभापती सौ.सरिता इंदलकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संदीप चव्हाण, दिलीप निंबाळकर, बाळासाहेब ननावरे, इंद्रजीत ढेंबरे, दादासाहेब बडदरे, महेश पाटील आदी इच्छुक आहेत.

लिंब गणातून प्रदीप पाटील, ॲड. विजय इंदलकर, प्रभाकर पवार, दत्ता पाटील, धर्मेंद्र सावंत, उमेश फाळके, तसेच कोंडवे गणातून माजी सभापती धर्मराज घोरपडे, माजी सरपंच एकनाथ इंगळे, विश्वजीत लाड, दादासाहेब बडदरे, सौ.संजीवनी धनवे, गणेश निंबाळकर, मच्छिंद्र गोगावले, धैर्यशील पवार आदी इच्छुक आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT