कोपर्डे हवेली : शेतात कामासाठी गेल्यानंतर कोपर्डे हवेलीमधील बेघर वसाहतीत भरदिवसा चोरी झाल्याची घटना घडली आहे. चोरट्यांनी सुमारे पाच तोळ्याचे दागिने लंपास केले असून कराड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, पारुबाई हणमंत पाडुळे या शेत मजुरीसाठी सकाळी दहा वाजता घरातून बाहेर पडल्या होत्या. सायंकाळी साडेपाच वाजता कामावरून घरी परतल्यानंतर दरवाजाचा कडी कोयंडा उचकटलेला दिसला. तसेच घरातील साहित्य अस्ताव्यस्त विस्कटलेले दिसून आले. त्यामुळे चोरी झाल्याचे समोर आले आणि चोरट्यांनी सोन्याची चेन, झुबे, बोरमाळ, बेलाचे पान, अंगठी असे जवळपास पाच तोळे सोने चोरट्याने लंपास केल्याचे उघडकीस आले.
त्यानंतर कराड पोलिस ग्रामीण पोलिसांना माहिती देण्यात आली.चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळी रात्री साडे अकराच्या सुमारास श्वान पथकास पाचारण केले होते. मात्र श्वान वसाहतीतच घुटमळत राहिले. त्यामुळे चोरट्यांचा ठावठिकाणा लावण्यात अपयशच आले आहे.
बेघर वसाहतीत आठ दिवसांपासून चोरीचे सत्र सुरू आहे. अमिर मुजावर यांचे पाच ग्रॅम सोने तसेच चांद शेख याचे तीन हजार चोरट्याने लंपास केले. गुरुवारी पुन्हा चोरी झाल्याने लोक भितीच्या छायेत आहेत.