कराड : खून, खुनाचा प्रयत्न यासह विविध गुन्ह्यांप्रकरणी कराड पोलिसांनी यापूर्वी कारवाई केलेल्या कुख्यात गुंड दीपक पाटीलने आपल्या टोळीच्या मदतीने पुन्हा दहशत माजविण्याचा प्रयत्न केला आहे. त्याने वारुंजी फाटा परिसरात मसाला दूध सेंटर व नारायणवाडी हद्दीतील एका वाईन शॉपसह परिसरात तोडफोड केली आहे. याप्रकरणी कराड शहर व कराड तालुका पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. दीपक पाटीलसह काही संशयितांना गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे.
अफताब अमजद मुतवली (रा. गोटे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, कराडजवळील वारुंजी फाटा परिसरात केजीएन मसाले दूध सेंटरवर 1 जूनला रात्री साडेनऊ वाजता अफताब यांना दीपक पाटील व किरण यमकरसह अनोळखी चार संशयितांनी ‘तू मला महिन्याला चार हजार रुपये द्यायचे नाही तर, तुला धंदा करू देणार नाही, कराडत फिरू देणार नाही’ असे धमकावले. तसेच गल्ल्यातील सात हजार रुपये जबरदस्तीने काढून घेत लोखंडी रॉडने दुकानातील काचेचे ग्लास, मोबाईल फोडला. याच परिसरातील अथर्व देशमुख यांच्या कारच्या काचा फोडून सुमारे 65 हजारांचे नुकसान करून दहशत निर्माण केली. या घटनेत अफताब जखमी झाले आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर तपास करत आहेत.
दुसर्या घटनेप्रकरणी अनिल रामचंद्र चंदवाणी यांनी कराड तालुका पोलीस ठाण्यात दिपक पाटील, शिवतेज तांबे, पंकज पाटील, यशराज पाटील, किरण यमगर, गणेश पाटील यांच्यासह अन्य दोन अनोळखी संशयितांविरूद्ध तक्रार दाखल केली आहे. चंदवाणी यांनी यात म्हंटले आहे, 1 जूनला दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास आणि रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास दिपक पाटीलसह संशयित पाचवड फाटा, नारायणवाडी येथे वाईन शॉपमध्ये आले. तेथे चंदवानी यांना ठार मारण्याची धमकी देत दारूसह सुमारे 2 हजारांचे साहित्य जबरदस्तीने नेले. तसेच रात्री पुन्हा 4 हजारांच्या दारूच्या बाटल्यांसह 6 हजार 300 रुपयांचे साहित्य नेले. तसेच एका संशयिताने मोबाईल फोडत 50 हजारांची मागणी केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्चना शिंदे तपास करत आहेत.