Satara Gazette: सातारा गॅझेट लागू करण्याचे पुढे काय झाले? Pudhari Photo
सातारा

Satara Gazette: सातारा गॅझेट लागू करण्याचे पुढे काय झाले?

मराठा समाजात धूसफूस : उपसमितीने दिलेली मुदत संपल्याने चर्चेला ऊत

पुढारी वृत्तसेवा

सातारा : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सातारा गॅझेट लागू करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, या घोषणेला महिना उलटून गेला असला तरी सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात कोणतीही हालचाल झाली नसल्याने सातारा गॅझेट लागू करण्याचे पुढे काय झाले? असा सवाल मराठा बांधव विचारत आहेत. मराठा समाजात पुन्हा धूसफूस सुरु झाली असून ऊलट-सुलट चर्चेलाही ऊत आला आहे.

मराठा आरक्षण उपसमितीने सातारा गॅझेट लागू करण्याची घोषणा केल्याने मराठा समाजामध्ये नवसंजीवनी निर्माण झाली होती. मात्र, आज त्या घटनाक्रमाला एक महिना उलटून गेला आहे आणि समाजाच्या मनात प्रश्न उभा आहे. सातारा गॅझेटची अंमलबजावणी अद्याप प्रत्यक्षात झालेली नाही.

गरजवंत मराठा समाजाच्या न्याय्य हक्कासाठी गेली अनेक वर्षे लढा देणारे संघर्षयोध्दा मनोज जरांगे-पाटील यांनी सातारा जिल्ह्यातील मराठा आरक्षणाच्या गॅझेट अंमलबजावणीची जबाबदारी सार्वजनिकरित्या ना. शिवेंद्रराजे भोसले यांना सोपवली होती. जिल्ह्यातील प्रशासन पातळीवर सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात कोणतीही ठोस कृती दिसत नाही. एक महिन्याचा अल्टीमेटम जाहीरपणे दिला गेला होता. त्या कालावधीत काय प्रयत्न झाले, याचा कोणताही अहवाल समाजासमोर आलेला नाही. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच राजकीय लाभासाठी समाजाच्या भावना वापरण्यात येत आहेत का?, सातारा जिल्ह्यात गरजवंत मराठा आरक्षण गॅझेटची अंमलबजावणी कोणत्या टप्प्यावर आहे? जबाबदारी घेतलेल्या बाबाराजे यांनी समाजासमोर अहवाल दिला आहे का? जर नाही, तर अंमलबजावणीसाठी पुढील कृती आराखडा काय आहे? असे सवाल आता विचारले जात आहेत.

सातारा गॅझेट लागू करण्यासाठी उपसमिती सदस्य ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी पुढाकार घेतला आहे, पण ठरलेली मुदत संपली असल्यामुळे समाजातून या संदर्भात आता विचारणा होऊ लागली आहे. त्यामुळे सातारा गॅझेट कधी लागू करणार आहे, त्याला वेळ का लागत आहे, नक्की अडचणी काय आहेत, हे जाणून घेण्यासाठी लवकरच ना. शिवेंद्रराजे भोसले यांना भेटून मराठा क्रांती मोर्चा त्यांच्याबरोबर चर्चा करणार आहे.
-बापू क्षीरसागर, राज्य समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT