सातारा : सातारा जिल्ह्यात उसतोडीपोटी इसार घेवून शेतकर्यांवर कोट्यवधी रुपयांचा दरोडा टाकणार्या टोळी मुकादमांवर 3 वर्षात एकूण 160 गुन्हे दाखल झाले आहेत. 2022 ते 2025 या कालावधीतील ही आकडेवारी असून दै.‘पुढारी’ने यावर सर्वप्रथम आवाज उठवला होता. दरम्यान, आता गळीत हंगाम सुरु होणार असल्याने शेतकर्यांनी खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. तसेच फसवणूक झाल्यास तात्काळ तक्रारी द्याव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे हा साखर पट्टा आहे. या भागात साखर उद्योगाची भरभराट झाली आहे. या उद्योगात उस तोड मजूर हा एक महत्वाचा घटक आहे. मात्र, शेतकर्यांची अडचण करून त्यांना लुटण्याचे प्रकार गेल्या काही वर्षात वाढले आहे. टोळ्या देतो असे सांगून थेट फसवणूक केली जात आहे. एकाचवेळी किमान 7 लाख ते 20 लाख रुपयांपर्यंतची उचल घेतली जाते. मात्र ना उसतोड कामगार मिळतो ना पैसे परत मिळतात. यामुळे सातार्यासह राज्यभरातील शेतकरी देशोधडीला लागले. सातारा जिल्ह्यात हे लोन पसरल्यानंतर सर्वप्रथम दै. ‘पुढारी’ने याला वाचा फोडली. ‘टोळ्यांकडून शेतकर्यांची तोडणी’ ही वृत्तमालिका डिसेंबर 2020 मध्ये प्रसिध्द केली.
ही वृत्तमालिका प्रसिध्द झाल्यानंतर फसवणूक झालेल्या शेतकरी व वाहतूकदारांनी दै. ‘पुढारी’कडे गार्हाणी मांडली. उघडउघड फसवणूक होत असताना पोलिस ठाण्यात त्याबाबत तक्रारीही दाखल केल्या जात नव्हत्या. ‘पुढारी’तील वृत्तमालिकेची गंभीर दखल घेत तत्कालीन पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी फसवणूकीबाबत गुन्हे दाखल करण्याचे जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांना आदेश दिले. त्यानंतर पुढारीने याचा पाठपुरावा केल्याने सुमारे 6 कोटी रूपयांची रक्कम शेतकर्यांना मिळाली. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याची गांभीर्याने दखल घेत सचिव दर्जाच्या अधिकार्यांना याबाबत कायदा करण्याचा मसूदा करण्याच्याही सूचना केल्या आहेत.
बीड, उस्मानाबाद परिसरातून ऊसतोड कामगार जिल्ह्यामध्ये गाळप हंगामामध्ये ऊसतोडीसाठी दाखल होतात. साखर कारखान्यांच्या ऊस वाहतूकदारांमार्फत ऊसतोडणी मजुरांना इसार देऊन तसेच त्यांचा प्रवास खर्च करुन आणतात. मुकादम तोडणीपूर्वी अडवून लाखो रुपयांचा इसार घेतात. अनेकदा ऊसतोडणी टोळ्या न पाठवता फसवणूक केली जाते. तसेच रक्कम परत मागायला गेलेल्या वाहतुकदारांवर सामूहिक हल्ले करण्याचे प्रकारही यापूर्वी झालेले आहेत. सातारा जिल्ह्यात यापूर्वी अनेक पोलिस ठाण्यांमध्ये टोळी मुकादमांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत.
दत्त साखर कारखाना, श्रीराम कारखाना, माळेगाव कारखाना, शरयू कारखाना, स्वराज कारखाना, दत्त इंडिया कारखाना, किसनवीर अशाप्रकारे बहुतांशी साखर कारखन्यांच्यावतीने तसेच वैयक्तिक शेतकर्यांनी पोलिस ठाण्यांमध्ये तक्रारी दिल्या आहेत. दरम्यान, दरवर्षी फसवणूकीचा होणारा हा एककलमी कार्यक्रम बंद व्हावा. जे दाखल गुन्हे आहेत त्याप्रकरणी तात्काळ चांगला तपास होवून शेतकर्यांना न्याय मिळावा, अशी मागणी सातारा जिल्ह्यातील उस उत्पादकांकडून होत आहे.