सातारा : जिल्ह्यात प्लास्टिक कचरा बंदी उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यात उघड्यावर प्लास्टिक कचरा टाकणाऱ्या व्यक्तीवर दंड वसुलीची कारवाई सुरू करण्यात आली आहे. स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत सातारा जिल्ह्यात उघड्यावर प्लास्टिक कचरा टाकणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाईस सुरुवात झाली आहे. जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय प्लास्टिक कचरा टाकणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी पथके कार्यरत झाली आहेत.
नागरिकांनी उघड्यावर कचरा न टाकता तो घंटागाडीत टाकावा. जिल्ह्यात प्लास्टिक कचरा निर्मूलन मोहीम तीव्र करण्याचे आदेश सर्व ग्रामपंचायतींना दिले आहेत. गावालगतचे रस्ते, महामार्गाच्या कडेला विखुरलेले प्लास्टिक व कचरा त्वरित संकलित करून त्याचे योग्य व्यवस्थापन करावे, अन्यथा संबंधित ग्रामपंचायतींवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल. ज्या ठिकाणी उघड्यावर कचरा टाकला जातो, त्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यात यावेत. त्यामध्ये कचरा टाकणारे नागरिक आढळल्यास कडक कारवाई करुन दंडात्मक कार्यवाही करावी. हागणदारीमुक्त अभियानाप्रमाणेच कचरा निर्मूलनासाठी रात्रगस्त घालून कचरा टाकणाऱ्यांना रंगेहात पकडण्यात येणार आहे.
यासोबतच, ग्रामस्थ, महिला बचतगट, युवक मंडळे, सहाय्यकारी संस्था व ग्रामस्तरावरील सर्व कर्मचारी यांच्या मदतीने रस्त्याकडील, नदीघाट, पुलाखालील जागा, बसस्थानके, टोलनाके, शाळा परिसर याठिकाणी स्वच्छता मोहीम राबवावी. महामार्गावर व गावालगत कचरा टाकून सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण करणाऱ्या व्यक्तीवर व दुकानदारांवर कारवाई करण्यात येणार आहे. जिल्ह्यात उघड्यावर प्लास्टिक कचरा टाकणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात झाली असल्याचे पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा माने-भोसले यांनी सांगितले.
या आदेशांच्या पार्श्वभूमीवर कराड तालुक्यातील वारुंजी येथे एकल प्लास्टिक वापरणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करून 24 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला, तर गोटे येथे 9 हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. या कार्यवाहीमध्ये गटविकास अधिकारी प्रताप पाटील, सहाय्यक गट विकास अधिकारी प्रसाद खेडेकर, पूनम पाटील, ग्रामपंचायत अधिकारी दीपक हिनुकले व जया साळुंखे यांनी सहभाग नोंदवला.
पंचायत समिती जावलीचे गटविकास अधिकारी डॉ. निलेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रा. पं. बिभवी ता. जावली येथे दुकानदारांना एकल प्लास्टिक वापर बंदीबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी विस्तार अधिकारी सौरभ टुभे, सरपंच संतोष बांदल, उपसरपंच कांताराम शिंदे, ग्रामपंचायत अधिकारी चंद्रकांत कोळी, स्वछता समन्वयक संतोष जाधव, मनोज खेडकर उपस्थित होते.