प्रेषित गांधी
महाबळेश्वर : तब्बल आठ वर्षांनंतर होणाऱ्या महाबळेश्वर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीच्या प्रारूप मतदार यादीत घोळ झाली आहे. अनेक ठिकाणी हक्काची मते असणारे मतदार दुसऱ्याच प्रभागात गेले आहेत. त्यामुळे इच्छुकांच्या जीवाला घोर लागला आहे.
महाबळेश्वर नगर परिषदेची रणधुमाळी सुरु झाली असून स्थानिक नेत्यांसह इच्छुक उमेदवार कामाला लागले आहेत. महाबळेश्वर पालिकेकडून देखील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीला वेग आला आहे. नुकताच प्रभागनिहाय आरक्षण सोडतीचा कार्यक्रम देखील पार पडला. प्रारूप मतदार यादीही जाहीर झाली. यादी चाळताना झालेला घोळ अनेकांच्या निदर्शनास आला. त्यांनतर सर्वत्र याची चर्चा सुरु झाली. एकाच घरामध्ये राहणाऱ्या दोन मतदारांची नावे वेगवेगळ्या प्रभागांमध्ये गेली आहेत. इच्छुक उमेदवारांची देखील नावे दुसऱ्याच प्रभागांमध्ये लागली आहेत. या मतदार यादीमध्ये असलेल्या मतदारांच्या रखाण्यात मतदारांचे पत्ते देखिल नसल्यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. या मतदारांना शोधायचे कसे? असा पेच निर्माण झाला आहे.
महाबळेश्वर शहरातील सर्वच दहाही प्रभागांमध्ये असा प्रकार झाला असून तब्बल दोनशेहून अधिक मतदारांची नावे इकडची तिकडे गेली आहेत. संबंध शहरात यामुळे संभ्रमावस्था निर्माण झाली असून हा घोळ निस्तरताना पालिकेच्या नाकीनऊ येणार आहे. या यादीवर हरकत घेण्याकरता 13 ऑक्टोबरपर्यंतची मुदत दिली गेली आहे. अंतिम प्रभागनिहाय मतदार यादी ही येत्या 28 ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार आहे.
प्रारूप मतदार यादीवर काम करण्यासाठी आतापासूनच इच्छुक उमेदवारांसह त्यांचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. हरकतीचा जणू महापूर येणार आहे. प्रारूप मतदार यादीमध्ये बदल न झाल्यास प्रसंगी न्यायालयात देखील दाद मागण्याचा इरादा अनेकांनी बोलून दाखवला.
महाबळेश्वर पालिकेचे एन दिवाळीच्या तोंडावर काम वाढले असून बीएलओसह पालिका अधिकाऱ्यांना प्रत्येक प्रभागनिहाय ग्राऊंडवर उतरून पुन्हा सर्व्हे करावा लागणार आहे. याबाबत पालिका प्रशासक योगेश पाटील यांनी माहिती देताना पालिका अधिकारी व बीएलओ यांना प्रभागनिहाय सर्व्हे करण्याच्या सूचना दिल्या आहेत.