सातारा : फलटण येथील डॉक्टर युवतीने गळफास घेतल्यानंतर शुक्रवारी दिवसभरात अनेक बाबी समोर आल्याने संपूर्ण राज्य हादरुन गेले आहे. गेल्या पाच महिन्यांपासून डॉक्टर युवतीची पोलिस तसेच राजकारण्यांसोबत लढाई सुरु असल्याचेही धक्कादायकरीत्या समोर आले आहे. मानिसक त्रास होत असल्याने अनुचित काही घडल्यास त्याला पोलिस जबाबदार असतील राहतील, असेही एका तक्रार अर्जात म्हटले होते. दुसरीकडे पोलिसांनीही डॉक्टर युवती विरुध्द तक्रारी केल्या आहेत. लेटर वॉरच्या या लढाईचाही तपास होण्याची गरज निर्माण झाली असून जे-जे दोषी असतील त्यांना कायद्याच्या कचाट्यात घेतले पाहिजे.
या प्रकरणात मृत डॉक्टर युवतीने याअगोदर पोलिसांसह इतर काही जणांविरुध्द तक्रार अर्ज केले आहेत. डॉक्टर युवतीचे हे एकूण 3 तक्रार अर्ज असून ते समाज माध्यमांवर व्हायरल झाले आहेत. पहिला तक्रार अर्ज 19 जून 2025 रोजीचा आहे. हा अर्ज डॉक्टर युवतीने फलटण उपअधीक्षक यांच्या नावाने केला आहे. त्यामध्ये असे म्हटले आहे की, पोलिस कर्मचारी आरोपींना मेडीकलसाठी आणतात. त्यावेळी आरोपी फिट नसताना देखील ‘मॅडम फिट द्या,’ असे दबाव आणतात. याबाबत पोलिस निरीक्षक महाडीक यांना माहिती दिली असता त्यांनीही उडवाउडवीची उत्तरे दिली. यामुळे फलटण पोलिस उपअधीक्षक आपण यात लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी, असा मजकूर आहे. याची पोहोच देखील घेतली आहे.
दुसरा तक्रारअर्ज हा माहिती अधिकाराचा आहे. डीवायएसपी कार्यालयाकडे वरील तक्रार अर्ज केल्यानंतर त्यावर कोणती कारवाई केली, ही बाब माहिती अधिकारात दिनांक 13 ऑगस्ट 2025 रोजी मागवण्यात आली आहे. तसेच या माहिती अधिकारासोबत 19 जून 2025 प्रत जोडली आहे. तसेच कोर्ट स्टॅम्प देखील लावले आहे.
तिसरा तक्रार अर्ज 4 पानांचा आहे. हा तक्रार अर्ज चौकशी समिती जिल्हा रुग्णालय सातारा यांच्या नावे केला आहे. हा अर्ज नेमका कधी केला आहे? त्या अर्जाची पोहोच आहे की नाही? हे समजून येत नाही. या अर्जामध्ये प्रामुख्याने पोलिस प्रशासनाविरुध्द तक्रार करण्यात आली आहे. यामध्ये सात ते आठ पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांची नावे आहेत. याबाबत सविस्तर हस्ताक्षराने लिहिण्यात आले आहे. यातील एका घटनेत खासदार व त्याचा पीए असाही उल्लेख आढळला आहे. पोलिसांनी काही आरोपींना मेडीकल करण्यासाठी आणले होते. त्यावेळी खासदार यांचे पीए तेथे आले. त्या पीएने डॉक्टर युवतीला फोन देवून माननीय खासदार बोलत आहे असे सांगितले. डॉक्टर युवती खासदार यांच्यासोबत बोलत असताना खासदार असे म्हणाले की ‘पोलिस कर्मचारी यांची कंप्लेट आहे की तुम्ही बीडचे असल्यामुळे आरोपींना फिट देत नाही,’ असा संवाद झाल्यानंतर ‘हे आरोप चुकीचे आहेत. असे आरोप होणार नाहीत, अशी हमी दिली,’ असा उल्लेख आहे. यामुळे दबाव आणणारा ते खासदार व त्यांचे पीए कोण? असा सवालही आता उपस्थित झाला आहे.