सातारा : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येप्रकरणी फलटण तालुका पोलिस ठाण्यातील फौजदार गोपाळ बदने याला निलंबित करण्यात आले आहे. याप्रकरणी फौजदार बदने याच्यासह प्रशांत बनकर यांचा पोलिस शोध घेत आहेत. दरम्यान, याप्रकरणातील सर्व घटनाक्रमाची चौकशी केली जाणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिली.
डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येने जिल्ह्यासह राज्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणात पोलिस कसून तपास करत असून संशयितांच्या शोधासाठी कडक पावले उचलण्यात आली आहेत. त्याअनुषंगाने पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी साताऱ्यातील जिल्हा शासकीय रुग्णालय (सिव्हिल) येथे शुक्रवारी दुपारी मृत डॉक्टर युवतीच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना त्यांनी तपासाबाबतची माहिती दिली. ते म्हणाले, डॉ. संपदा मुंडे यांच्या तळहातावर लिहलेला मजकूर निदर्शनास आला आहे. हातावर फौजदार गोपाळ बदने व प्रशांत बनकर यांचे नाव लिहिले आहे. दोघांनी मानसिक त्रास दिला असून एकाने बलात्कार केला असल्याचेही म्हटले आहे. यावरून पोलिस ठाण्यात बलात्कार व आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन्ही संशयितांचा पोलिस शोध घेत असून अद्याप ते सापडलेले नाहीत. तांत्रिक तपास करुन संशयितांना लवकरच अटक केली जाईल. याप्रकरणात मृत डॉक्टर युवतीच्या कुटुंबियांनी जे-जे आरोप केले आहेत त्या प्रत्येकाची चौकशी केली जाईल. यामध्ये कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. ही गंभीर घटना असून बलात्कार व आत्महत्या झालेली आहे. घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर तळ ठोकून असून तपासाची चक्रे गतीमान करण्यात आली आहेत.
या घटनेने फलटणसह राज्यात खळबळ उडाली आहे. घटनास्थळाचा बारकाईने तपास व्हावा, यासाठी फॉरेन्सिक व्हॅन गुरुवारी रात्रीपासून तेथेच तैनात करण्यात आली आहे. बारीकसारीक सर्व घटना फॉरेन्सिक पथक हाताळणार आहे. दरम्यान, ज्या हॉटेलमध्ये ही घटना घडली आहे तेथील सीसीटीव्ही ताब्यात घेतले असून त्यावरुनही तपास सुरु असल्याचे एसपी तुषार दोशी यांनी सांगितले.
डुप्लिकेट चावीने दार उघडलं आणि...
गुरुवारी रात्री डॉ. संपदा मुंडे यांनी मधुदीप हॉटेलमधील रुम बुक केली होती. रुममध्ये गेल्यानंतर बराचवेळ त्या बाहेर आल्या नाहीत. इंटरकॉमवरून फोन येत नव्हता. यामुळे हॉटेल प्रशासनाने त्यांच्या रुमची बेल वाजवली. मात्र, तरीही त्यांचा प्रतिसाद मिळत नव्हता. यामुळे हॉटेल प्रशासनाने डुप्लिकेट चावीने डॉक्टर युवतीची रुम उघडली. त्यावेळी त्या गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्या, अशी माहिती पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिली.