सातारा : सातार्यातील शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सराफाचे दुकान फोडण्याचा प्रयत्न करणार्या दोघा चोरट्यांना जागरूक नागरिकांनी बेदम चोप दिला. यावेळी झालेल्या पकडापकडीत चोरट्याने हल्ला केल्याने एकजण जखमी झाला. यामुळे संतप्त जमावाने चोरट्यांना आणखी बदडले. दरम्यान, संशयितांवर जबरी चोरी व दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एक चोरटा अल्पवयीत आहे.
ऋषीकेश सदानंद तिताडे (रा. जुनी भाजी मंडई, सातारा) असे चोरट्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकाचे नाव आहे. ही घटना दि. 30 जुलै रोजी जुनी भाजी मंडई येथे पहाटे घडली आहे. याबाबत माहिती अशी, प्रवीण भोसले यांचे सोने-चांदीचे दुकान आहे. दोन चोरटे हे दुकान फोडत होते. पहाटेची वेळ असल्याने परिसरातील काही नागरिक फिरायला निघाले होते. दुकानातील फोडाफोडीच्या आवाजाने नागरिक सतर्क झालेे. बघता बघता मोठ्या संख्येने नागरिक जमा आले. या जमावाने चोरट्यांना पकडून चोप दिला. यादरम्यान चोरट्यांनी नागरिकांवर हल्ला केल्याने परिसरात आरडाओरडा होऊन आणखी नागरिक जमले. चोरट्यांनी हल्ला केल्याने जमाव संतप्त बनला. या घटनेची माहिती शाहूपुरी पोलिसांना देण्यात आली. तोपर्यंत जमावाने दोन्ही चोरट्यांवर प्रतिहल्ला करत यथेच्छ बडवून काढले. पोलिस आल्यावर चोरट्यांना ताब्यात घेतले. याप्रकरणी संशयित दोघांवर जबरी चोरी व दुखापत केल्याप्रकरणीचा गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दोन्ही संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर जमावाकडून त्यांना किरकोळ दुखापत झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी दोघांकडे चौकशीला सुरुवात केल्यानंतर त्यांनी सातार्यात आणखी काही चोर्या केल्याचे समोर येत आहे. पोलिस त्यानुसार खातरजमा करून माहिती घेत आहेत.