यंदा वरुणराजाच बनला वैरी; खरीप हंगामासह बळीराजा धोक्यात 
सातारा

Satara : यंदा वरुणराजाच बनला वैरी; खरीप हंगामासह बळीराजा धोक्यात

सततच्या पावसाने मशागत ठप्प; केवळ 20 टक्के पेरण्या पूर्ण

पुढारी वृत्तसेवा
विठ्ठल चव्हाण

ढेबेवाडी ः दरवर्षी पावसासाठी देवाकडे धावा करणारा बळीराजा यंदा मात्र ‘उघडीप दे रे बाबा’ अशी आर्त विनवणी करताना दिसत आहे. ढेबेवाडी विभागात मे महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेने शेतकर्‍यांपुढे मोठे संकट उभे केले आहे. पावसाने क्षणभरही विश्रांती न घेतल्याने खरीप हंगामापूर्वीची मशागतीची कामेच ठप्प झाली आहेत. परिणामी, जुलै महिन्याचा पहिला आठवडा संपत आला तरी विभागात केवळ 20 टक्के पेरण्या झाल्या असून, 80 टक्के शेतकरी हताशपणे आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत. यामुळे संपूर्ण खरीप हंगामच वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

साधारणपणे एप्रिल आणि मे महिन्यात पडणार्‍या वळवाच्या पावसावर शेतकरी खरीपपूर्व मशागतीची कामे उरकून घेतो. नांगरणी, वखरणी करून शेती पेरणीसाठी तयार केली जाते. मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या सुरुवातीला मान्सून दाखल झाल्यावर मिळणार्‍या उघडिपीच्या काळात पेरण्यांची लगबग सुरू होते. मात्र, यंदा निसर्गाचे चक्रच बदलले आहे. 10 मेपासून सुरू झालेल्या पावसाने सुरुवातीला अधूनमधून हजेरी लावली, ज्यामुळे शेतात ओल निर्माण होऊन मशागत करणे अशक्य झाले.पाऊस काही दिवसांनी विश्रांती घेईल, या अपेक्षेवर असलेल्या शेतकर्‍यांचा अंदाज पूर्णपणे फोल ठरला. मे महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यांत पावसाने अक्षरशः झोडपून काढले आणि तेव्हापासून आजतागायत त्याने उघडीप दिलेलीच नाही. सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचून राहिले आहे. यामुळे शेतकर्‍यांना धूळवाफेवरील पेरणी तर सोडाच, पण भात रोपे तयार करण्यासाठी आवश्यक असलेले वाफे तयार करण्याचीही संधी मिळाली नाही.

ज्या काही शेतकर्‍यांनी धाडस करून भाताचे बियाणे टाकले होते, त्यांची रोपे आता तयार झाली आहेत. मात्र, शेतात गुडघाभर पाणी साचल्याने आणि पावसाचा जोर कायम असल्याने भात लागवडीची कामेही रखडली आहेत. गेल्या आठवडाभरात थोडीफार लागवड सुरू झाली असली, तरी तिचे प्रमाण नगण्य आहे. जुलै महिना उजाडल्याने पेरणीची वेळ निघून जात आहे. या नैसर्गिक संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT