कराड ः राज्यातील सर्वच शहरांबरोबर मोठ्या गावांमध्ये नव्या इमारती बांधताना पार्किंग व्यवस्थेकडे केले जाणारे दुर्लक्ष हा चिंतेचा विषय बनला आहे. त्यामुळेच तेथे नव्याने इमारती बांधत असताना नगरपालिका, नगरपंचायत तसेच ग्रामपंचायतीसह वाहतूक पोलिसांची परवानगी बंधनकारक करावी, अशी संकल्पना सातारा जिल्हा पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांच्या विचाराधीन आहे. लवकरच याबाबत त्यांच्याकडून तसा प्रस्ताव जिल्हाधिकार्यांकडे पाठविला जाण्याचे संकेत आहेत. ही संकल्पना सत्यात उतरल्यास मुख्य शहरांसह उपनगरांमध्ये वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यास मोठी मदतच होणार आहे.
पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी काही दिवसांपूर्वीच पदभार स्वीकारताच सातारा, कराड या शहरांसह जिल्ह्यातील सर्वच प्रमुख शहरे, मोठी गावे यांची माहिती घेतली आहे. व्यावसायिक इमारत अथवा घर बांधताना जो आराखडा मंजूर केला जातो, त्यानुसार बांधकाम होते का याकडे संबंधित प्रशासकीय अधिकारी गांभीर्याने पाहातच नाहीत. त्यामुळे बहुतांश लोक मंजूर आराखड्याप्रमाणे बांधकाम न करता पार्किंगच्या जागा ठेवण्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळेच आज शहरांसह उपनगरांमध्ये बहुतांश वाहने घरासमोरील रस्त्यावरच पार्क करतात. याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर होतो. पुण्यासारख्या शहरांत नवी इमारत बांधताना स्थानिक स्वराज्य संस्थेप्रमाणेच पोलिसांची परवानगी लागते. त्यामुळे पार्किंग व्यवस्था व रस्त्यावर दिवस-रात्र उभ्या वाहनांचा प्रश्न निकाली निघण्यास मदतच होते.