सातारा : प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रियेसाठी शिक्षकांनी जोडलेल्या दिव्यांग प्रमाणपत्र व गंभीर आजार पडताळणी जिल्हा रुग्णालयामार्फत करण्यात आली. तपासणीसाठी 555 शिक्षक उपस्थित होते. मात्र, 67 शिक्षकांनी दांडी मारली तर 112 शिक्षकांचे वैद्यकीय प्रमाणपत्र अयोग्य असल्याचा अहवाल जिल्हा रुग्णालयाने दिला आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
सातारा जिल्हा परिषदेंतर्गत सन 2025 मधील शिक्षक संवर्गातील जिल्ह्यांतर्गत बदल्यांबाबत कार्यवाही करण्यात येत आहे. मात्र, काही शिक्षकांनी दिव्यांग किंवा गंभीर आजारी असल्याचे सांगत विशेष सवलतीचा लाभ घेण्यासाठी प्रमाणपत्रे सादर केली होती. याबाबत काही शिक्षकांनी आक्षेप घेतला होता. या बदली प्रक्रियेबाबत दिव्यांग शिक्षकांनी सादर केलेल्या दिव्यांग प्रमाणपत्रांची पडताळणी छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालय यांच्यामार्फत केली. 4 जुलैपासून पडताळणीची प्रक्रिया सुरु होती. ही प्रक्रिया 1 ऑक्टोबरपर्यंत सुरु होती.
प्राथमिक शिक्षण विभागाने जिल्हा रुग्णालयास तपासणीसाठी 622 शिक्षकांची यादी पाठवली होती. त्यापैकी प्रत्यक्ष तपासणीसाठी 555 शिक्षक उपस्थित राहिले. त्यापैकी 356 शिक्षकांनी सादर केलेले प्रमाणपत्र योग्य असल्याचे आढळून आले. तर 112 शिक्षकांनी सादर केलेले दिव्यांग किंवा गंभीर आजारी असल्याचे प्रमाणपत्र अयोग्य असल्याचे निदर्शनास आले तर 67 शिक्षकांनी प्रत्यक्ष तपासणीसाठी दांडी मारली. ज्या शिक्षकांची प्रमाणपत्रे अपात्र ठरली आहेत, अशा शिक्षकांना प्राथमिक शिक्षण विभागामार्फत कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी यांनी दिली. दरम्यान, शिक्षकांवर मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन काय कारवाई करणार याकडे जिल्ह्यातील शिक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.