वाईच्या ग्रामीण भागात पेरण्यांची लगबग सुरू झाली आहे. Pudhari Photo
सातारा

Satara News | वाई परिसरात पावसाच्या पुनरागमनाने पेरणीला वेग

बळीराजा सुखावला : शेतीकामांची लगबग; दुबार पेरणीचे संकटही कायम

पुढारी वृत्तसेवा

वाई : वाई, पाचगणी आणि महाबळेश्वर तालुक्यात पावसाने दमदार पुनरागमन केल्याने शेतीच्या कामांना अखेर वेग आला आहे. सुरुवातीच्या अतिवृष्टीमुळे लांबलेल्या पेरण्या आता पुन्हा एकदा सुरू झाल्या असून, बळीराजाची शेतामध्ये लगबग पाहायला मिळत आहे. बैलजोडीच्या कमतरतेमुळे आणि वेळेची गरज ओळखून पेरणीसाठी ट्रॅक्टरला अधिक पसंती दिली जात आहे. आतापर्यंत तालुक्यात सुमारे 50 टक्के पेरणीची कामे पूर्ण झाली आहेत.

महिनाभरापूर्वी पावसाने जोरदार हजेरी लावली, पण सततच्या पावसामुळे जमिनीत वापसा (पेरणीयोग्य ओल) नसल्याने मृग नक्षत्रातील कडधान्यांची पेरणी खोळंबली होती; मात्र गेल्या दोन दिवसांपासून दिवसा कडक ऊन पडत असल्याने जमिनीने उसंत घेतली आणि पेरणीसाठी आदर्श स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कोरडवाहू जमिनीतील पेरणीला वेग आला आहे. तथापि, ज्या शेतकर्‍यांनी अतिपावसातच पेरणीची घाई केली होती, त्यांच्यावर आता दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे, ज्यामुळे त्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, या पावसाचा एक सकारात्मक परिणाम म्हणजे तालुक्यातील सर्व लहान-मोठे बंधारे तुडुंब भरले आहेत. धोम, बलकवडी आणि नागेवाडी या प्रमुख धरणांमधील पाण्याची पातळी गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट झाली आहे, ज्यामुळे पिकांच्या पाण्याची चिंता मिटली आहे.

सध्या शेतकरी पूर्णपणे शेतीकामात गुंतल्याने बाजारपेठांमध्ये मात्र शुकशुकाट दिसत आहे. पावसाच्या या लहरीपणाचा परिणाम पीक उत्पादनावर होण्याची शक्यता असली तरी, येत्या 15 दिवसांत पेरणीची धामधूम पूर्ण करून बळीराजा बेंदूर सणाच्या तयारीला लागेल, अशी आशा आहे.

पश्चिमेकडे भाताची रोपे तर पूर्वेकडे भुईमुगाची पेरणी

खरीप हंगामात मूग, तूर, चवळी, सोयाबीन बाजरी, भुईमूग, हायब्रीड या पिकांची पेरणी करण्यात पूर्व भागातील शेतकरी मग्न आहे. तर पश्चिम भागात भाताची रोपे तयार करताना शेतकरी दिसत आहे. त्यासाठी लागणारे उत्तम प्रकारचे खत व बियाणे खरेदीसाठी दुकानातून गर्दी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT