वडूज : वडूज परिमंडलाचे वनपाल यांच्या शासकीय कामात अडथळा आणून त्यांना कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण करणाऱ्या गोरेगाव वांगी येथील सुरेश शिवाजी भाग्यवंत याला वडूज येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने सक्त ताकीद व फिर्यादीला नुकसान भरपाई म्हणून 5 हजार रूपये देण्याची शिक्षा सुनावली आहे.
याबाबतची माहिती अशी, 2 जून 2020 रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास गोरेगाव वांगी गावात फिर्यादी विष्णुपंत विठ्ठल बिचुकले, वनअधिकारी फुंदे, चालक महेश पाटोळे हे पेट्रोलिंग करत असताना आरोपी सुरेश शिवाजी भाग्यवंत याच्या जवळ वृक्षतोडीचा व वाहतुकीचा परवाना नसताना विना नंबरचे ट्रॅक्टर मधून लिंब व आंबा वृक्ष तोडून त्याची वाहतूक करत होता. याबाबत त्यांच्याकडे विचारणा केली असता त्याने फिर्यादीस शिवीगाळ करून कुऱ्हाडीच्या लाकडी दांड्याने मारहाण करून तेथून पळून गेला.
याबाबत औंध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात महिला पोलिस उपनिरीक्षक स्नेहल सोमदे यांनी साक्षीदारांचे जाब-जबाब नोंदवले व कसून तपास करून आरोपींविरुद्ध अति. जिल्हा व सत्र न्यायालय, वडूज येथे दोषारोपपत्र दाखल केले. वडूज येथील अति. जिल्हा व सत्र न्यायालयात या कामी सरकारी पक्षाच्यावतीने जिल्हा सरकारी वकील वैभव काटकर यांनी काम पाहिले. यामध्ये सरकार पक्षाच्यावतीने 7 साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांचे जाब-जबाब, कागदोपत्री व वैद्यकीय पुरावा व सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून अति.जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. एस. कोले यांनी आरोपीला शिक्षा सुनावली.