फलटण : ज्यांनी तीस वर्ष तालुक्याला मागे नेले आहे, अशा माणसाशी मनोमिलन कदापि होणार नाही. शेतकर्यांना नडणार्यांसमवेत दोस्ती करायची नाही. अनैसर्गिक युती वा मनोमिलन या तालुक्यात होणार नाही, असे स्पष्टीकरण माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिले.
राजाळे, ता. फलटण येथील कार्यक्रमात ते बोलत होते. दोन दिवसांपूर्वी आ. रामराजे नाईक निंबाळकर यांनी रणजितसिंहांकडे टोलविलेला मनोमिलनाचा चेंडू रणजितसिंहांनी त्यांच्याकडे माघारी धाडत मनोमिलनाच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.
राजाळेतील कार्यक्रमात रणजितसिंह म्हणाले, विधानसभेला काम करणार्या सर्वांना बरोबर घेऊन पुढे जाणार आहे. कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि कार्यकर्ता म्हणूनच काम करत राहणार आहे. विकास कामाच्या बाबतीत कोणी चर्चा करणार असेल तर माझी सर्वांना चर्चेची दारे सदैव उघडी आहेत. पण 4000 शेतकर्यांना नडणार्या माणसाबरोबर रणजितसिंह नाईक निंबाळकर स्वप्नात तरी त्यांच्याबरोबर बसतील का? आपण शेतकर्यांच्या हितासाठी काहीही करायला तयार आहोत. आता मला काहीही मिळवायचं नाही. या तालुक्याला सध्या कर्तृत्ववान आमदार मिळाला आहे.
जनतेने कोणत्याही अफवांना बळी पडू नये. जाता येता कोणाचीही भेट होत असेल तर ती टाळायची का? संजीवबाबांनी तालुक्यातील प्रश्नासाठी मला कॉल केला. काम सांगितलं तर त्यांचा सन्मान ठेवायचा का नाही? हा प्रश्न करून ते पुढे म्हणाले, आपल्याला बदलावयाचं आहे, बदला नाही घ्यायचा. तीस वर्ष ज्यांनी तालुक्याला मागे नेले आहे, अशा माणसाशी युतीही नाही व मनोमिलन तर कदापी होणार नसल्याचे स्पष्ट करुन रणजितसिंह म्हणाले, विश्वासराव भोसले यांच्यासारख्या युवक मित्राच्या मागे मी ठामपणे उभा राहणार आहे. शेतकर्यांना नडणार्यांसमवेत दोस्ती करायची नाही.
दरम्यान, रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मनोमिलन स्पष्टपणे नाकारल्याने मनोमिलनाच्या तथाकथित चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. तालुक्यामध्ये दोन निंबाळकरांमध्ये राजकीय संघर्ष यापुढेही कायम पाहायला मिळणार असल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
रामराजेंचाही सन्मान ठेवणार...
मला नेतेपदाचा अहंकार शिवला नाही आणि शिवणारही नाही, असे सांगून रणजितसिंह ना. निंबाळकर म्हणाले, मला त्या गीताच्या ओळी आठवतात, ‘एक दिन तू बिक जायेगा माती के मोल, दुनिया मे रहे जायेंगे प्यारे तेरे बोल’. त्यानुसार आपलेपणा व दुसर्यांचा सन्मान मी ठेवतोय. रामराजेंचाही सन्मान ठेवणार. विधानसभेच्या वेळीच आमदारांनाही सांगितले आहे की, रामराजेंच्या सल्ल्याची गरज भासली तर तालुक्याच्या विकासासाठी त्यांचाही सल्ला घ्या. राजकारण व्यवसाय नसतो. विरोधकांचा, महिलांचा सन्मान करण्याची शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांनी आपणाला दिली आहे.