खटाव : ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट यांच्या मदतीने निढळ (ता. खटाव) मधील शंभर एकरपेक्षा जास्त क्षेत्रावर कृत्रिम बुद्धिमत्ता (ए.आय.) आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने ऊस लागवड केली जाणार आहे. यामुळे उत्पादन वाढून खर्चात बचत होणार असल्याने येथील शेतकरी आर्थिकदृष्ट्या समृद्ध होण्यास मदत होणार आहे. त्यादृष्टीने रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते ऊस शेतीत नवी क्रांती घडवणाऱ्या ‘मेन वेदर स्टेशन’चा शुभारंभ करण्यात आला.
दिवसेंदिवस जमिनीची सुपीकता कमी होत चालली आहे. तसेच वातावरणातील बदलामुळे नवनवीन कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. अशातच काही शेतकरी खते, कीटकनाशके आणि पाण्याच्या अनावश्यक अधिक वापर करतात. परिणामी, आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अभाव असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा एकरी उत्पादन खर्च वाढत चालला असून उसाची उत्पादकता व साखर उतारा कमी झाला आहे.
यावर मात करण्यासाठी चंद्रकांत दळवी यांच्या प्रयत्नातून निढळच्या पाच किलोमीटर परिसरातील ऊस लागवड कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान वापरून केली जाणार आहे. यात सॅटेलाईट मॅपिंगच्या मदतीने निवडलेल्या प्रक्षेत्रावरील मातीचे परिक्षण व अभ्यास केला जाईल. लागवडपूर्व ते तोडणीपर्यंत सातत्याने मातीतील ओलावा व पोषक घटकांची माहिती रोज मोबाईलवर येणार असल्याने शेतकऱ्यांना सिंचन व खत व्यवस्थापन अचूक करता येणार आहे.