सातारा : सातारा नगरपालिकेचे नगराध्यक्षपद कुठल्या पक्षाला सोडायचे, यावरून गेल्या दोन दिवसांपासून महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या मॅरेथॉन बैठका सुरू होत्या; मात्र राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडूनच मातब्बर इच्छुकांची मागणी लक्षात घेता याच पक्षाकडे नगराध्यक्षपदाची उमेदवारी सोडण्याच्या निर्णयावर महाविकास आघाडीचे रविवारी एकमत झाले.
सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यात पहेले तुम... पहेले तुमचा प्रकार काही दिवसांपासून सुरु आहे. त्यातच भाजपच्या नाराजांना महाविकास आघाडी संधी देईल, असे सूचक विधान राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांनी केल्याने भाजपने उमेदवाऱ्या जाहीर करण्याबाबतीत सावध पवित्रा घेतला. भाजपचे निवडणूक प्रभारी ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी तर आमच्या निर्णयावरच महाविकास आघाडी टपून आहे, असे म्हटले होते. या परिस्थितीमध्ये अधिकृत उमेदवाऱ्यांबाबत भाजप आणि महाविकास आघाडी या दोघांनी अत्यंत गोपनियता पाळली आहे. दोन्ही बाजूंनी नेत्यांच्या मॅरेथॉन बैठका सुरु आहेत. भाजपमधूनच इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त असल्याने नाराज मंडळी महाविकास आघाडीकडे उमेदवारी मागू शकतात, असा अंदाज असल्याने महाविकास आघाडीचे नेते अजूनही वेट ॲण्ड वॉचच्या भूमिकेत आहेत. दरम्यान, सातारा पालिकेसाठी महाविकास आघाडीकडून डॉ. संदीप काटे, ॲड. बाळासाहेब बाबर, शरद काटकर, सुजित आंबेकर, बाळासाहेब शिंदे, अजित कदम यांची नावे चर्चेत असून यापैकीच एक नाव नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी फायनल होणार असल्याची माहिती महाविकास आघाडीमधील सूत्रांनी दिली.
नगरसेवक पदाच्या 50 जागांसाठी महाविकास आघाडीकडे 36 उमेदवारांची यादी तयार आहे. त्यामध्ये सर्वाधिक जागा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडे राहणार आहेत, त्या खालोखाल शिवसेना, काँग्रेस, मनसे, आरपीआय असे उतरत्या क्रमाने नगरसेवकपदाची उमेदवारी वाटली जाणार आहे. रविवारीही काही उमेदवारांनी राष्ट्रवादी भवनात हजेरी लावून हालचालींवर लक्ष ठेवल्याचे पहायला मिळाले. आम्ही काय करु? पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म मिळणार नसेल तर आम्ही अपक्ष फॉर्म भरतो, असेही काहींनी पक्ष कार्यालयात येऊन सुनावल्याची चर्चा आहे.