चाफळ : चाफळ येथून दाढोली मार्गे पाटणकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची अवस्था बिकट आहे. या रस्त्यावर दोन्ही बाजूंना झाडी, झुडपे व काटेरी वेली वाढल्याने वाहन चालकांना समोरून येणारी वाहने दिसत नाहीत. शिवाय बिबट्याचीही भीती आहे.
अनेक ठिकाणी डांबर निघून गेल्याने मुरूम व दगड उघडे पडले आहेत. त्यामुळे विशेषतः रात्रीच्या वेळी प्रवास धोकादायक ठरत आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, या घाट परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून अनेक वेळा तो रस्ता ओलांडताना दिसून आला आहे. झाडी दाट असल्याने बिबट्याला लपण्यासाठी अनुकूल ठिकाण आहे. रस्त्याने जाणारे प्रवासी व वाहन चालक भीत भीत प्रवास करतात.
या मार्गावरून विद्यार्थी ये-जा करतात. विद्यार्थ्यांना पायी रस्ता ओलांडावा लागतो. दाट झाडीमुळे बिबट्या झाडीतून अचानक बाहेर येऊन हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे ग्रामस्थ सांगतात. त्यामुळे पालकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व वनखात्याकडे वारंवार तक्रारी दिल्या असून, रस्ता दुरुस्त करणे, झाडी छाटणी करणे व बिबट्याच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी वनखात्याने पिंजरा लावावा, अशी मागणी केली आहे.
स्थानिकांनी प्रशासनास तातडीने लक्ष देण्याची विनंती केली असून, रस्ता रुंद करून झाडांची छाटणी करावी अशी मागणी केली आहे. मोठा अपघात किंवा बिबट्याचा हल्ला झाल्यास प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. यावर प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे.