वेलंग : धावली, ता. वाई येथे बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. एका बंगल्यात शिरून बिबट्याने कुत्र्याचा फडशा फाडला आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. बिबट्या मानवी वस्तीत येत असल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून वाई तालुक्याच्या पश्चिम भागात बिबट्यांचे प्रमाण वाढले आहे. धावली, व्याहाळी, बोरगाव, कोंढवली परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. या भागातील बहुसंख्य लोक उपजिविकेसाठी दुग्धव्यवसायावर अवलंबून असून, बिबट्याच्या भीतीमुळे जनावरे बाहेर चारण्यासाठी नेणे धोक्याचे ठरत आहे. बिबट्यामुळे पंचक्रोशीत खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, नागरिकांनी वनविभागाकडे बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. वनविभागाने तात्काळ कारवाई न केल्यास संतप्त ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा स्थानिकांनी दिला आहे.