कराड : पुणे-बंगळूर आशियाई महामार्गावर कराड ते मलकापूर दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीने वाहनधारकांसह प्रवासी त्रस्त झाले आहेत. येथील वाहतूक कोंडी केव्हा सुटणार असा प्रश्न परिसरातील व्यापारी, प्रवासी व नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
पुणे-बंगळूर आशियाई महामार्गाच्या सहा पदरीकरणाचे काम गत दोन वर्षांपासून सुरू आहे. या सहा पदरीकरणाअंतर्गतच कराड ते मलकापूर दरम्यान सुमारे साडेतीन किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्याच वेळेला या महामार्गावरील कराड ते मलकापूर दरम्यानची वाहतूक सेवा रस्त्यावरून वळवण्यात आली आहे. येथील उड्डाणपुलाखालून आठ लेनचा रस्ता तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे गत दोन वर्षांपासून येथे वारंवार वाहतूक कोंडी होत असून वाहनधारकांसह प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
गत काही दिवसांपासून सायंकाळच्या सुमारास कराड, कोल्हापूर नाका ते नांदलापूर दरम्यान वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीस वाहनधारक वैतागले आहेत. शहरात दीपावलीच्या खरेदीसाठी ग्रामीण भागातून येणारी वाहने तसेच लोकांची गर्दी होत असल्याने व उड्डाणपुलाखाली अनेक ठिकाणी असलेल्या वळण रस्त्यामधून वाहने आडवीतिडवी रस्त्यावर येत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. याशिवाय उड्डाणपूलाखालून दोन्ही बाजूला चार-चार पदरी असा एकूण आठ पदरी रस्ता करण्याचे काम सुरू आहे.
या कामामुळे अनेक वेळेला वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून वाहतूक कोंडी होत आहे. तसेच सध्या ढेबेवाडी फाटा ते कोल्हापूर नाका दरम्यान उड्डाणपूलाखालून सिमेंट काँक्रिट गटरचे काम सुरू आहे. या कामामुळे सेवा रस्त्यावरील वाहतूक अतिशय धीम्या गतीने सुरू असते. त्यामुळे वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागत आहेत.
या वाहतूक कोंडीमध्ये प्रवाशांसह वाहनधारक तासंतास अडकून पडत आहेत. त्यामुळे प्रवाशाना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सध्या उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आले असून कोल्हापूर नाका ते ढेबेवाडी फाटा यादरम्यान वाहतूक सेवा रस्त्यावरून वळवण्यात आली आहे. त्यामुळे सेवा रस्त्यावर वाहनांची गर्दी होत असून येथेही वाहतूक कोंडी होत आहे.