सातारा : राज्यात 11 वी साठी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. यामध्ये अर्ज भरताना पात्र असूनही केवळ माहितीअभावी अनुदानित ऐवजी विनाअनुदानितला क्लिक केल्यामुळे विद्यार्थ्यांची अडचण झाली आहे. प्रवेश नाकारला तर तो विद्यार्थी अपोआपच प्रक्रियेतून बाहेर पडणार असल्याने शैक्षणिक नुकसानीचा धोकाआहे. त्यामुळे प्रवेश निश्चितीस येणार्या विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला आहे. याचा अनेक विद्यार्थी व पालकांना आर्थिक भुर्दंड बसणार आहे.
तब्बल एक महिन्याच्या प्रतिक्षेनंतर 55 हजार प्रवेश क्षमतेसाठी जिल्ह्यातील विविध कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये 11 वी प्रवेश प्रक्रिया सुरु झाल्याने विद्यार्थी व पालकांची गर्दी होवू लागली आहे. प्रथम फेरीतील 11वी प्रवेश दि. 7 जुलैपर्यंत मुदत असल्याने प्रवेश निश्चिती केली जात आहे. विद्यार्थी पालकांसाठी प्रवेश प्रकियेत पारदर्शकता व सुलभता येण्याऐवजी मनस्तापच सहन करावा लागत आहे.
ऑनलाईन अर्ज भरताना महाविद्यालय निवडीवेळी अनुदानित व विनाअनुदानित असे दोन पर्याय होते. काही विद्यार्थ्यांकडून माहिती अभावी किंवा अज्ञानाने अनुदानित ऐवजी विनाअनुदानित पर्यायावर क्लिक केले गेले आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चितीवेळी प्रवर्गनिहाय आरक्षण व अनुदानित तुकडीतील प्रवेशासाठी पात्र असताना प्रवेश मिळू शकत नाही. प्रवेश प्रक्रिया पुढे गेली असून हरकती नोंद किंवा दुरुस्तीची संधीही हुकली आहे. ऐन प्रवेशावेळी ही गोष्ट समोर आल्याने विद्यार्थी व पालकांचा गोंधळ उडाला आहे.
आजी माजी सैनिक पाल्य, उच्च गुणवत्ताधारकांनाही याचा फटका बसला आहे. पहिल्या गुणवत्ता यादीत प्रवेशाची संधी असताना केवळ विनाअनुदानित म्हणून प्रवेश नाकारला तर प्रवेश प्रक्रियेतून बाहेर पडणार आहे. त्यामुळे वर्ष वाया जावून शैक्षणिक नुकसानीचा धोका संभवतो. परिणामी विद्यार्थी पालकांना फी भरावी लागणार असल्याने आर्थिक भुर्दंड बसत आहे.
जिल्ह्यात 11 वी प्रवेश क्षमता 55 हजार असली तरी कला, वाणिज्य व विज्ञान शाखेसाठी 49 हाजार 80 प्रवेश उपलब्धता आहे. त्यापैकी पहिल्या फेरीत कला शाखेसाठी 16 हजार 110 जागा असून 3 हजार 548 विद्यार्थी, वाणिज्य शाखेसाठी उपलब्ध जागा 11 हजार 890 तर अलॉटेड 2 हजार 919, विज्ञान शाखेसाठी 21 हजार 80 जागा उपलब्ध असून 9 हजार 666 विद्यार्थी प्रवेश मान्यता मिळाली आहे. या अलॉटमेंट झालेल्या 16 हजार 133 जागांसाठी दि. 7 जुलैपर्यंत प्रवेश निश्चित होणार आहेत.