सातारा : जिल्ह्यात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे आगमन झाल्यानंतर सातारा पोलिस दल अलर्ट मोडवर गेले आहे. माऊलींचा सोहळा चार दिवसांच्या मुक्कामाला असल्याने त्यासाठी 2 हजार पोलिस वारकर्यांच्या मेळात राहून कर्तव्य बजावत आहेत. पालखी मार्गावर पोलिसांचा चोख बंदोबस्त असून, 4 ड्रोनही तैनात करण्यात आले आहेत.
पालखीसोबत लाखो भक्त पंढरपूरपर्यंत पायी चालत जात आहेत. पुणे जिल्ह्यातून सातार्यात पालखी आल्यानंतर चार दिवस माऊलींचा मुक्काम आहे. यादरम्यान कुठेही वारकर्यांना अडचण येऊ नये. भक्तिमय वातावरणात पालखी जावी यासाठी सातारा पोलिस डोळ्यात तेल घालून कर्तव्य बजावत आहेत. पोलिस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांनी गेल्याच आठवड्यात वारी बंदोबस्ताचे नियोजन केले. यासाठी पालखी मार्गावर जाऊन सर्व पाहणी करून स्थानिक पोलिसांना बंदोबस्ताच्या सूचना केल्या. गुरुवारी पालखीचे सातारा जिल्ह्यात जल्लोषात आगमन झाले असून, पालखी पुढे पुढे मार्गक्रमण करत आहे.
पालखी सोबत तसेच पालखी मुक्कामाच्या ठिकाणी पोलिस खाकीसह साध्या वेशात कार्यरत आहेत. याशिवाय शेकडो पोलिस व्हॅनदेखील तैनात आहेत. वारीमध्ये गर्दीचा गैरफायदा घेऊन चोर्या करणारे हौशे, गवशेदेखील सामील झालेले असतात. यामुळे संबंधितांवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिस साध्या वेशासह ड्रोनच्या माध्यमातून वारीवर लक्ष ठेवत आहेत. वृद्ध, लहान मुले व महिलांना अडचणी येऊ नयेत. त्यांना तत्काळ मदत मिळावी यासाठी संपूर्ण वारीमध्ये पोलिसांचा बंदोबस्त चोख ठेवला आहे. याशिवाय पालखी मार्गावरील वाहतूक वळविली असून, संपूर्ण वारी मार्गावर देखील पोलिसांच्या छावण्या बंदोबस्तासाठी तयार केल्या आहेत.
सातारा जिल्हा पोलिस दलाच्यावतीने पालखी तळावर व पालखी मार्गावर सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. याशिवाय पालखी मार्गावर ठिकठिकाणी पोलिस मदत केंद्र देखील उभारण्यात आले आहेत. वारी दरम्यान कोणाला अडचण आल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.