फलटण : घरेलू कामगारांचे जे प्रश्न व समस्या सोडवण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. आपल्या अखत्यारीत ज्या-ज्या समस्या व प्रश्न येतात त्याबाबत आपण निश्चितपणे केंद्र स्तरावर संबंधित विभागाच्या मंत्र्यांशी बोलून त्यांच्या सोडवणुकीसाठी पाठपुरावा करु. वेळप्रसंगी सदर प्रश्न संसदेतही मांडू, अशी ग्वाही खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांनी केले.
कोळकी ता. फलटण येथे समता घरेलू कामगार संघटनेच्या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार दीपक चव्हाण, सातारा जि. प.चे माजी अध्यक्ष संजीवराजे ना. निंबाळकर, जया नलगे, विजय खरात, अरविंद मेहता, समता घरेलू कामगार संघटनेच्या अध्यक्षा कल्पना मोहिते उपस्थित होत्या. खा. मोहिते पाटील म्हणाले, विधानपरिषदेचे माजी सभापती आ. रामराजे नाईक निंबाळकर, संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण तालुक्यामध्ये जेवढ्या घरेलू कामगार महिला आहेत, त्यांच्यासाठी आम्ही सर्वजण सातत्याने प्रयत्नशील राहू. घरेलू कामगार संघटनेच्या सर्व सदस्यांना शासनाच्या सर्व योजनांचे लाभ मिळवून देणे त्याचबरोबर त्यांच्या मागण्या, प्रश्न समस्या सोडवण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.
संजीवराजे म्हणाले, घरकाम करणार्या महिलांना शासकीय योजनांबरोबरच लाभ अन्य ज्या योजना आहेत त्यांची माहिती आणि त्याही योजनांचा लाभ त्यांना कसा घेता येईल या दृष्टिकोनातून समता घरेलू कामगार संघटनेने आयोजित केलेला हा कार्यक्रम महत्वपूर्ण आहे. प्रत्येकाच्या कामाला सन्मान व आर्थिक सुरक्षाही मिळायला हवी. घरेलू कामगारांचे प्रश्न खा. धैर्यशील मोहिते पाटील हे निश्चितपणे मार्गी लावतील. स्वागत व प्रास्ताविक कल्पना मोहिते यांनी केले. सूत्रसंचलन आनंद पवार यांनी केले. आभार किरण कांबळे यांनी मानले. कार्यक्रमास घरेलू काम करणार्या महिला उपस्थित होत्या.