फलटण : फलटण शहर व तालुक्यातील विविध विकास कामांचे लोकार्पण, उद्घाटन व भूमिपूजन रविवार दि. 26 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते होणार आहे. यशवंतराव चव्हाण हायस्कूलच्या विस्तीर्ण मैदानावर मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा होणार असल्याची माहिती माजी खासदार रणजितसिंह ना. निंबाळकर यांनी दिली. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अचानक होत असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याकडे सातारा जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यातील कार्यक्रमाबाबत माहिती देताना रणजितसिंह म्हणाले, निरा-देवघर कालव्याच्या पाईपलाईनच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ, पाडेगाव साखरवाडी रस्ता, दहिवडी फलटण रस्त्याचा शुभारंभ. फलटणमधील नवीन उपजिल्हाधिकारी कार्यालय, तलाठी व मंडळ कार्यालय बांधकामांचे भूमिपूजन, बानगंगा नदी स्वच्छता प्रकल्प, फलटण शहरांमधून वाहणाऱ्या निरा उजव्या कालव्याचे सुशोभीकरण कामांचा शुभारंभ होणार आहे. तसेच सेशन कोर्ट, महसूल भवन इ कामांचे भूमिपूजन पार पडणार आहे. फलटण शहर व ग्रामीण पोलिस ठाण्यांच्या इमारतींचा लोकार्पण सोहळा होणार आहे.
नाईकबोंबवाडी येथील एमआयडीसी प्रकल्पासंदर्भात अधिकारी, उद्योगपती यांच्याशी बैठक होणार आहे. फलटणच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांच्या निधीची घोषणा मुख्यमंत्री करण्याची शक्यता असल्याने तालुक्यातील जनतेने कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन रणजितसिंह यांनी केले आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात साखरवाडी येथे अप्पर तहसील कार्यालय तसेच पोलिस निरीक्षक नियुक्तीबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे.