सातारा : सातारा जिल्ह्यातील हजारो प्रवाशांचा सार्वजनिक प्रवास सुखकर करणार्या एसटी महामंडळाची टोलच्या कचाट्यातून अद्यापही सुटका झालेली नाही. दरमहिन्याला सातारा विभागाला 1 कोटी 18 लाख 73 हजार 114 रुपयांचा टोल भरावा लागत आहे. टोलचा भुर्दंड तोट्यात असलेल्या महामंडळाला सोसावा लागत आहे. त्यासाठी गरीबरथाला टोलमाफीची गरज आहे.
एसटी महामंडळाच्या बसेसना टोल आकारला जात असल्याने महिन्याला कोट्यवधी रुपयांचा फटका बसत आहे. एसटी महामंडळ आधीच तोट्यात आहे आणि या तोट्याला महिला प्रवाशांना दिलेल्या 50 टक्के सवलतीमुळे आणखी वाढ झाली आहे. याशिवाय अवैध वाहतूक, जुन्या बस दुरुस्त करण्याचा खर्च आणि भाडेतत्वावरील ई-बसमुळे होणारे नुकसान यामुळेही एसटीला आर्थिक फटका बसत आहे. यामुळे महिन्याकाठी मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. विविध सवलत योजनांमुळे एसटीकडे प्रवाशांचा ओढा वाढल्याचे चित्र आहे. त्यातच
सध्या सर्वच आगारांना आलेल्या नवीन बसेसमुळे एसटीच्या दैनंदिन आर्थिक उत्पन्नामध्ये वाढ झाली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सातारा विभागात सातारा, कराड, पाटण, वाई, महाबळेश्वर, पारगाव-खंडाळा, फलटण, वडूज, दहिवडी, कोरेगाव, मेढा या 11 आगारांमध्ये 707 बसेस व 25 खासगी बसेस अशा मिळून 732 बसेस आहेत. या बसेस लांब पल्यासह ग्रामीण भागात दररोज धावत असतात. या बसेसच्या माध्यमातून महामंडळाला दररोज लाखो रुपयांचा टोल भरावा लागतो त्यामुळे महामंडळाच्या आर्थिक स्थितीवर ताण येतो.
एसटीला टोल माफ केल्यास महामंडळाला नफ्याच्या जवळ जाता येईल. तसेच टोलमुळे होणारा महामंडळाचा आर्थिक तोटा कमी होण्यास मदत होईल.
सातारा आगाराला सर्वाधिक फटका
सातारा विभागातील सातारा आगारास 26 लाख 71 हजार 470 रुपये, कराड आगारास 12 लाख रुपये, फलटण आगारास 7 लाख 66 हजार 238 रुपये, वाई आगारास 17 लाख 35 हजार 656 रुपये, महाबळेश्वर आगारास 7 लाख 71 हजार 46 रुपये, मेढा आगारास 8 लाख 49 हजार 200 रुपये, पाटण आगारास 5 लाख 64 हजार 679 रुपये, वडूज आगारास 9 लाख 43 हजार 908 रुपये, दहिवडी आगारास 7 लाख 80 हजार रुपये, कोरेगाव आगारास 9 लाख 50 हजार रुपये, पारगाव-खंडाळा आगारास 6 लाख 40 हजार 917 रुपये असे मिळून दर महिन्याला 1 कोटी 18 लाख 73 हजार 114 रुपयांचा टोल एसटीला भरावा लागत आहे.