बदलत्या हवामानाचा शेती व्यवसायाला फटका 
सातारा

Satara News : बदलत्या हवामानाचा शेती व्यवसायाला फटका

जिल्ह्यात ठिकठिकाणी मशागतींसह पेरण्या खोळंबल्या; बळीराजा चिंतित

पुढारी वृत्तसेवा

सातारा : वारंवार होणार्‍या हवामान बदलामुळे ऋतुचक्र कोलमडले असून अवकाळी पावसामुळे शेती व्यवसाय संकटात आला आहे. काढणीस आलेल्या पिकांची नासाडी झाली असून रब्बी हंगामातील मशागतींसह पेरणीची कामे खोळंबली आहेत. वेळेत पेरणी न झाल्यास हंगाम वाया जाणार आहे. आर्थिक नियोजन विस्कटणार असल्याने बळीराजा चिंतित झाला आहे.

यावर्षी मे महिन्यापासून सलग सहा महिने पावसाळा सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील काही भागात खरीपातील पेरण्या होऊ शकल्या नाहीत. तर जे पेरले ते देखील परतीच्या पावसाने हाती लागले नाही. काढणीस आलेल्या पिकांची नासाडी झाली. आता रब्बी हंगाम तरी चांगला होईल या आशेवर असलेल्या शेतकर्‍यांची निराशा झाली आहे. कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे मागील आठवड्यापासून अवकाळी पाऊस पडत आहे. त्यामुळे ज्वारीची पेरणी लांबली आहे. आधी पेरणी झालेल्या शेतकर्‍यांना दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.

शेतजमिनीला घात नसल्याने बाजरी, गहू, हरभरा आदी पिकांची पेरणीपूर्व मशागतींची कामे खोळंबली आहेत. त्यामुळे या पिकांची पेरणीदेखील लांबणीवर पडणार असल्याने पुढील नियोजन कोलमडणार आहे. तसेच रब्बीतील कांदा लागवड ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान केली जाते. मात्र यावर्षी पावसामुळे कांदा रोपे तयार करण्यात अडथळा आल्याने लागवडीसाठी कांदा रोपांचा तुटवडा भासत आहे.

सध्या साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू झाला आहे. मात्र पावसामुळे ऊस वाहतूक जिकरीची झाली आहे. त्यामुळे रस्त्याकडेच्या उसांच्या फडांना तोड दिली जात आहे. वेळेआधीच हा ऊस गाळपासाठी जात असल्याने वजनात मार बसत आहे. एकूणच पावसाचे वेळापत्रक बदलले असून त्याचा फटका शेती व्यवसाला बसत आहे. वेळ-अवेळी पडणार्‍या पावसामुळे पिकांचा पेरणी व काढणी हंगाम लांबत असल्याने बळीराजाचे आर्थिक नियोजनही विस्कटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रतिकूल परिस्थितीत उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आल्याने ऋतुचक्र व हावामानातील बदलांमुळे शेतकरी वर्गात चिंता वाढली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT