सातारा : आरोग्याबाबत जागृती वाढली असून सकस व संतुलित आहारात फळे, हिरव्या पालेभाज्या, फायबरयुक्त अन्नघटकांना प्राधान्य दिले जात आहे. मात्र, ही फळे व भाज्यांवर रासायनिक घटक मानवी आरोग्यास हानीकारक ठरत आहेत. फळ भाज्यांचा रंग अन् आकार वाढवण्यासाठी वापरले जाणारे ऑक्सिटोक्सीन किंवा एरिथ्रोमायसीन इंजेक्शन मानवी शरीरात हार्मोनल असंतुलन होवून आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर येत आहे.
फळे, भाजीपाला शेतकरी पिकवत असला तरी त्याची प्रत्यक्ष विक्री ही व्यापारी वर्गाकडून होते. या शेतमालाचा उत्पादन ते ग्राहक या प्रवासात काही कालावधी जात असल्याने ती ताजी व टवटवीत रहावीत, यासाठी विशेष काळजी घ्यावी लागते. बाजारपेठेत फळे व भाज्यांचा रंग व चकमक कायम राहून ताजेपणा टिकवण्यासाठी काही व्यापाऱ्यांकडून विविध क्लृप्त्या लढवल्या जात आहेत. बाजारात मिळणाऱ्या फळांवर मेणाचा लेप, कॅल्शियम कार्बाईड किंवा एथिलीन गॅसचा वापर केला जातो. टोमॅटो, वांगी, भोपळा, दोडका आदि फळभाज्यांचा रंग व तजेलपणा टिकण्यासाठी ऑक्सिटोसीन हे इंजेक्शनवर वापर केला जात आहे. हे प्राण्यांना दिले जाणारे हार्मोन्स असून ते अप्रत्यक्षरित्या शरीरात गेल्याने हार्मोनल असंतुलन होवून आरोग्याच्या समस्या उद्भवण्याचा धोका आहे.
बऱ्याचदा प्रक्रिया न केलेल्या सांडपाण्यावरही पिकवलेला भाजीपाला विकला जात आहे. सांडपाण्यातील रासायनिक व मानवी आरोग्यास हानीकारक घटक या भाज्यांमध्ये शोषले जातात. अशा फळभाज्या, पालेभाज्या खाल्ल्यास मानवी शरीरावर विपरीत परिणाम होवून आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर येणार आहे.