सातारा : रयत शिक्षण संस्थेच्या शाळा, महाविद्यालयांमध्ये 1 जुलै 2025 पासून आर्टिफिशयल इंटेलिजन्स (एआय) अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या शिक्षणाला सुरुवात होत आहे. पाचवीपासून ते पदवीपर्यंत हा अभ्यासक्रम शिकवला जाणार असून रयतमधील ही तंत्रज्ञानाची शैक्षणिक क्रांती आहे. या शैक्षणिक उपक्रमामुळे रयतचा विद्यार्थी उद्योजकता व जागतिक स्पर्धेसाठी सक्षम होतील असा विश्वास रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी व्यक्त केला. दरम्यान, सातार्यात ‘सेंटर ऑफ एक्सलन्स इन रोबोटिक्स अॅन्ड ऑटोमेशन’ स्थापना करुन त्याचेही उद्घाटन करण्यात आले.
सातार्यात गुरुवारी झालेल्या कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील कार्यक्रमात खा. शरद पवार बोलत होते. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, सचिव विकास देशमुख, आ. शशिकांत शिंदे, संघटक अनिल पाटील, सहसचिव राजेंद्र मोरे, प्रतापराव पवार उपस्थित होते.
खा. शरद पवार म्हणाले, ऑक्सफर्ड विद्यापीठातील डॉ.अजित जावकर यांच्या मार्गदर्शनाखाली कृत्रिम बुध्दिमत्ता शैक्षणिक उपक्रम सुरु करण्यात आला आहे. गेल्या 9 महिन्यांहून अधिक काळ यावर रयतच्या सर्व पदाधिकारी, शिक्षकांनी काम केले आहे. बारामती येथे शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षित शिक्षकांनी 300 पेक्षा अधिक मास्टर ट्रेनर व ट्रेनर तयार केले आहेत. यामुळे आता रयत शिक्षण संस्थेच्या प्रत्येक शाळेत एआयचे ट्रेनर उपलब्ध आहेत.
रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये दोन कोटी रुपयांचे सेंटर ऑफ एक्सलन्स इन रोबोटिक्स अॅन्ड ऑटोमेशनची स्थापना करण्यात आली आहे. या केंद्रामध्ये एआय, हाय परफॉर्मन्स कम्प्युटिंग, थ्रीडी प्रिंटींग, पीएलसी ऑटोमेशन, आधुनिक सीएनसी मशीन यासारख्या अत्याधुनिक जागतिक तंत्रज्ञानाचे शिक्षण दिले जाणार असल्याचे खा. शरद पवार म्हणाले. कार्यक्रमाच्या अगोदर सेंटर ऑफ एक्सलन्स या केंद्रात केलेल्या संशोधनाची पाहणी मान्यवरांनी केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॉलेजचे प्राचार्य ए. सी. आत्तार यांनी केले. यावेळी मान्यवरांचे स्वागत झाल्यानंतर कृत्रिम अभ्यासिका पुस्तकीचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर रयतचे चंद्रकांत दळवी, विकास देशमुख, सुनील झोरे, प्रतापराव पवार, रमेश ललवाणी यांनी मनोगते व्यक्त केली. आभार प्रा. डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी मानले.