प्रवीण माळी
तासवडे टोल नाका : 1997 ला तळबीड गण अस्तित्वात आल्यापासून माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांचे उंब्रज गट आणि तळबीड गणावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांना रोखण्यासाठी भाजप,अजित पवार राष्ट्रवादी गट, काँग्रेस काय रणनीती आखणार याकडे लक्ष लागले आहे.अठरा वर्षानंतर तळबीड गण खुला झाल्याने लढती अटीतटीच्या होणार आहेत.
या गणातील लढती दुरंगी तिरंगी किंवा चौरंगी होण्याची शक्यता आहे. उंब्रज गटांतर्गत तळबीड गण येत असून यामध्ये वहागाव, घोणशी, तळबीड, तासवडे, वराडे ,बेलवडे हवेली, हनुमानगाव, भवानीनगर, शिवडे ,कळंत्रेवाडी नानेगाव पुनर्वसित व मांगवाडी या बारा गावांचा समावेश आहे. गणात आत्तापर्यंत राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्येच लढती झाल्या आहेत.
2002 ते 2007 मध्ये सर्वसाधारण महिला , भास्करराव पवार , सुनंदा सुतार , प्रणव ताटे हे सर्व माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या गटाचे निवडून आले होते. दरम्यान 2017 मध्ये तिरंगी लढत झाली होती. यावेळी भाजपकडून तळबीडचे सागर शिवदास, राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रणव ताटे तर काँग्रेसकडून जगन्नाथ सुतार अशी लढत झाली होती. यावेळीही बाळासाहेबांचे समर्थक प्रणव ताटे हे निवडून आले होते .
मागील झालेल्या सर्वच पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांचा गट हा प्रबळ होता .परंतु दोन वर्षापासून संपूर्ण राज्यातील राजकीय गणिते बदलली आहेत. बदललेल्या राजकारणाचा थेट परिणाम विधानसभेलाही झाला. कराड उत्तर विधानसभा निवडणुकीत मनोज घोरपडे आमदार म्हणून निवडून आले. दरम्यान तळबीड गणात बाळासाहेब पाटील गट, उदयसिंह पाटील गट, भाजपा आणि काँग्रेस असे चार गट आहेत . यामध्ये बाळासाहेब पाटील व काँग्रेस महाविकास आघाडीमध्ये तर उदयसिंह पाटील गट अजित पवार राष्ट्रवादी पक्षात असून भाजपासह महायुतीत समाविष्ट आहे. तसेच मागील तीन वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असणारे अनेकांनी अजित पवार राष्ट्रवादी गटात प्रवेश केला आहे. तळबीड गण कराड दक्षिण व कराड उत्तर असा विभागला आहे.
कराड दक्षिणमधील वहागाव व घोणशी दोन गावे येतात तर बाकीचे सर्वच गावे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील आहेत. तसेच यावेळी भाजपचे कराड उत्तरचे मनोज घोरपडे व दक्षिणचे डॉ. अतुल भोसले विद्यमान आमदार आहेत . यामुळे या गणात भाजपचाही गट प्रबळ झाला आहे. तसेच उदयसिंह पाटील गटाचे कराड तालुका खरेदी विक्री संघाचे विद्यमान चेअरमन तळबीड गावचे असून बेलवडे हवेली मध्ये या गटाची सत्ता आहे त्यामुळे काकागटही प्रबळ आहे. माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी आत्तापर्यंत निवडून आलेल्या अनेक जणांना पंचायत समिती व अनेक ठिकाणी मोठ्या पदावर काम करण्याची संधी दिली आहे. दरम्यान अठरा वर्षानंतर तळबीड गण सर्वसाधारण पुरुष साठी खुला झाला आहे.