सातारा : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघांमध्ये तारळी धरणाचे पुनर्वसन झालेली गावे आहेत. या गावांमधील नागरी वसाहतीतील विकासकामांसाठी 1 कोटी 41 लाख 14 हजार रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती आ. मनोज घोरपडे यांनी दिली आहे.
याबाबत माहिती देताना आ. मनोज घोरपडे यांनी सांगितले की, कराड उत्तर विधानसभा मतदारसंघांमध्ये 33 गावांचे पुनर्वसन झालेले आहे. गेली अनेक वर्ष त्या गावांना नागरी सुविधा मिळाल्या नाहीत. त्यासाठी मंत्रालय व जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठक घेतली होती. संबंधित गावांना ज्या नागरी सुविधा मिळाल्या नाहीत, त्यासाठी अंमलबजावणी करण्यास सूचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने कराड उत्तर मधील तारळी धरणातील पुनर्वसित गावातील नागरी सुविधांसाठी 1 कोटी 41 लाख 14 हजार रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे.
यामध्ये सावरघर येथे आरसीसी गटर बांधणे, भांबे येथे अंतर्गत आरसीसी गटर बांधणे, सावरघर येथे विद्युत पंपास वीज पुरवठा करणे, कारंजोशी येथे पाणी पुरवठा विहिरीस वीज पुरवठा करणे, भांबे, सावरघर, कारंजोशी येथे स्मशानभूमीचा लोखंडी सांगाडा तयार करणे इत्यादी कामासाठी निधी मंजूर झालेला आहे. उर्वरित उरमोडी, धोम, उत्तरमांड, तारळी आदी पुनर्वसित गावांच्या समस्या टप्प्याटप्प्याने सोडवल्या जातील, असेही आ. मनोजदादांनी सांगितले.