कुपवाड : शहरातील वॉर्ड नंबर एकमधील रामकृष्णनगर, अहिल्यानगर, ढवळेश्वर कॉलनी, प्रकाशनगर, इंदिरानगर आदी भागात ऐन दिवाळीत अपुरा व अनियमित पाणीपुरवठा होत आहे, तर रामकृष्णनगर भागात पाणीपुरवठा होत नसल्याने रविवारी टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. सणासुदीत अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
कुपवाड शहर प्रभाग समिती तीनच्या कार्यक्षेत्रातील वॉर्ड नंबर एकमध्ये सन 2023 मध्ये पाणीपुरवठा सुरळीत होता. काही भागात दोन वेळा पाणी येत होते. महापालिका सदस्यांची मुदत संपल्यानंतर कारभार प्रशासनाच्या हातात आला, तेव्हापासून वॉर्ड नंबर एकमधील पाणीपुरवठा विस्कळीत झालेला आहे. वॉर्ड नंबर एकमधील पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी माजी उपमहापौर प्रशांत पाटील, कुपवाड शहर भाजपचे माजी अध्यक्ष रवींद्र सदामते, युवा नेते ऋषिकेश सूर्यवंशी, माजी उपमहापौर मोहन जाधव व विविध सामाजिक संघटना, नागरिकांनी वेळोवेळी महापालिका प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली होती.
वॉर्ड नंबर एकमधील पाणीपुरवठा तातडीने सुरळीत न झाल्यास कुपवाड शहर प्रभाग समिती तीनच्या कार्यालयासमोर आंदोलन छेडणार असल्याचा इशारा पाटील व सदामते यांनी महापालिका अधिकार्यांना प्रत्यक्ष भेटून दिला होता. तरीही प्रशासनाने अद्याप पाणीपुरवठा सुरळीत केला नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. वॉर्ड नंबर एकमधील काही भागात नवीन पाईपलाईन टाकायची बाकी आहे. ते काम त्वरित करून घेऊन संबंधित अधिकारी यांची एकत्रित बैठक घेऊन लवकरात लवकर तोडगा काढण्याचे व पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन अधिकार्यांनी दिले होते.