सांगली ः रस्त्यावर पडलेले रक्त, होत्याचे नव्हते झालेले आयुष्य आणि रोजच मृत्यूंचे तांडव असेच काहीसे चित्र गेल्या काही महिन्यात जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. दररोज किमान एकाचा तरी अपघातात मृत्यू होत असून पाच महिन्यांत 252 जणांना आपला जीव गमावावा लागला आहे, तर 254 जण जायबंदी झाले आहेत. जिल्ह्यात नव्याने झालेल्या राष्ट्रीय महामार्गावर प्राणांतिक अपघाताचे प्रमाण जास्त असल्याचे स्पष्ट झाले आहे.
जिल्ह्यात रस्त्यावरचा प्रवास म्हणजे थेट मृत्यूला आमंत्रण देण्यासारखेच चित्र निर्माण झाले आहे. वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, मात्र रस्त्यांची स्थिती, वाहतूक नियंत्रण व्यवस्था आणि नियमांचे पालन या गोष्टींकडे सर्रास दुर्लक्ष होत असल्याचे हे आकडे दर्शवतात. खरे तर होत असलेले अपघात हे अपघात नसून प्रशासनाच्या आणि यंत्रणांच्या हलगर्जीपणाचे फलित ठरत आहेत.
गेल्या जून महिन्यात तीन दिवसांत चारजणांचा मृत्यू झाला होता. शर्वरी कुलकर्णी ही महाविद्यालयीन युवती बसच्या चाकाखाली सापडली. सांगली-इस्लामपूर रस्त्यावर तुंगजवळ दुचाकीवरील दोघांना कारने उडविले. विश्रामबाग उड्डानपुलावर दुचाकीवरून निघालेल्या दाम्पत्याला काँक्रिट मिक्सर डंपरने ठोकरले. यात दीड वर्षापूर्वीच विवाह झालेल्या तरुणीचा मृत्यू झाला. सुखी संसाराची स्वप्नेच अपघाताने हिरावून घेतली, अशा कित्येक घटना दररोज जिल्ह्यात घडत आहेत.
अतिवेग आणि वाहतुकीचे नियम तोडणे : वाहनचालक सर्रास नियम
मोडत आहेत, कोणतीही भीती नाही, कारण कारवाईच होत नाही.
अतिक्रमण आणि खड्डे : फूटपाथ, रस्त्यांची बाजू, चौक हे दुकानदारांनी
आणि राजकीय पाठबळ असलेल्या अतिक्रमणांनी व्यापले आहेत. तर
रस्ते खड्ड्यांनी माखलेले आहेत.
वाहनांची अनियंत्रित वाढ : जिल्ह्यात 14 लाखांपेक्षा अधिक वाहने
आहेत. मात्र त्याला पूरक रस्त्यांची व वाहतूक पथकांची व्यवस्था नाही.
रस्त्यांवरील सुरक्षेचा अभाव : हॉस्पिटल, शाळा, बाजार, चौक येथे
झेब्रा क्रॉसिंग नाहीत, सीसीटीव्ही यंत्रणा नादुरुस्त आहे.
जिल्ह्यातून पुणे - बंगळुरू, गुहागर - विजापूर, कराड - विजापूर, नागपूर - रत्नागिरी असे चार राष्ट्रीय महामार्ग जातात. या चारही महामार्गांवर प्राणांतिक अपघाताचे प्रमाण जास्त आहे. अपघातांचे ‘हॉटस्पॉट’ वाढले आहेत. गावा-गावांतील अंतर्गत रस्तेदेखील धोकादायक झाले आहेत. अपघातांच्या ठिकाणी ना स्पीड ब्रेकर, ना सिग्नल, अंधारी वळणे, अवैध कटिंग, चुकीच्या बाजूने चालणारी वाहने अपघाताला कारणीभूत ठरत आहेत. जिल्ह्यातील रस्ते हा ‘प्राणघातक मार्ग’ बनला असल्याचे स्पष्ट होते.