सांगली : ‘माणूस पै पै चा हिशेेब ठेवतो’, असं म्हणतात. पण सांगली, मिरजेसह जिल्ह्यातील विविध बँकांमध्ये खातेदारांचे 176 कोटी नुसते पडून आहेत. कारण बचत, चालू व मुदत ठेव स्वरूपात ठेवलेले तब्बल 7 लाख 75 हजार 315 खातेदार गेली 10 वर्षे झाली, आपले पैसे घ्यायला पुन्हा बँकेकडे फिरकलेच नाहीत. ‘तीन महिन्यांच्या आत बँकेत या आणि तुमचे पैसे परत न्या’ अशी मनधरणी आता रिझर्व्ह बँक करू लागली आहे.
जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी शनिवारी याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले, खातेदार पैसे न्यायला फिरकलेच नसल्याने ही रक्कम रिझर्व्ह बँकेत जमा केली आहे. मृत खातेदारांचे वारस किंवा जिवंत असलेल्या खातेदारांनी 31 डिसेंबरपर्यंत संबंधित बँकेशी संपर्क साधावा. ज्या बँकेत आपले खाते आहे, तेथे कागदपत्रे सादर करून आपली रक्कम काढून घ्यावी. रिझर्व्ह बँकेने यासाठी दिलेल्या तीन महिन्यांच्या मुदतीत बँकेला कागदपत्रे सादर करावीत.
बँकांमध्ये बचत खाते, चालू खाते व ठेव स्वरूपात असलेल्या 10 वर्षापेक्षा जास्त काळ दावा न केलेल्या, म्हणजेच रकमा काढण्यासाठी जे खातेदार बँकेकडे फिरकलेच नाहीत, अशा स्वरूपातील रकमा परत मिळवण्यासाठीची जनजागृती व दावा मोहीम चालू आहे.
नियमाच्या अधीन राहून या मोहिमेअंतर्गत खातेदारांना त्यांच्या खात्यावरील रक्कम काढून घेता येईल किंवा पुढे नूतनीकरण करून ठेवताही येईल. ठेवी परत मिळविण्यासाठी संबंधित खातेदारांनी किंवा त्यांच्या वारसांनी आपल्या बँकेच्या शाखेत संपर्क साधून आवश्यक कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. या मोहिमेद्वारे सर्व बँकांकडून जनजागृती शिबिरे व ग्राहक भेटी आयोजित केल्या जाणार आहेत. खातेदारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी काकडे यांनी केले आहे.
हा पैसा कुणाचा..?
यामध्ये सर्वाधिक रक्कम ही सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील खातेदारांची आहे. येथील 3,72,838 खातेदारांची 75.72 कोटी रुपये रक्कम आहे. त्यानंतर बँक ऑफ इंडियाच्या 1,61,918 खातेदारांचे 33.54 कोटी, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या 44,939 खातेदारांचे 16.99 कोटी, आयसीआयसीआय बँकेच्या 96,917 खात्यांवर 16.15 कोटी, बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये 1,616 खात्यांवर 8.77 कोटी, युनियन बँक ऑफ इंडियाच्या 30,075 खात्यांवर 7.65 कोटी, रत्नाकर बँकेच्या 24,968 खात्यांवर 5.80 कोटी, तसेच इतर बँकांनीही रक्कम रिझर्व्ह बँकेकडे वर्ग केली आहे.