सावळीतील खून फुकटचा मावा, दारूवरून 
सांगली

सावळीतील खून फुकटचा मावा, दारूवरून

दोघांना अटक : मृत कुख्यात गुंड म्हमद्याचा साथीदार

पुढारी वृत्तसेवा

कुपवाड : कुख्यात गुंड म्हमद्या नदाफचा साथीदार व मोक्कातील गुन्हेगार समीर रमजान नदाफ (वय 41, रा. रॉयल सिटी मारवा अपार्टमेंट, कुपवाड) याचा सोमवारी रात्री सावळी (ता. मिरज) हद्दीत झालेला खून हा फुकटचा मावा व दारूच्या कारणावरून झाल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. याप्रकरणी सांगलीतील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने दोघांना अटक केली. त्या दोघांना पुढील तपासासाठी कुपवाड पोलिसांच्या ताब्यात दिले. सोहेल सलीम काझी (वय 30, रा. खारे मळा चौक, कुपवाड) व सोहेल ऊर्फ साबीर शरीफ मुकादम (वय 26, रा. बडेपीर कॉलनी, जुना मिरज रोड, कुपवाड) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

संशयित सोहेल काझी व साबीर मुकादम या दोघांनी सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास त्यांचा मित्र रेकॉर्डवरील गुन्हेगार समीर नदाफ याला सावळी (ता. मिरज) येथील आरटीओ ऑफिसच्या शेजारील मोकळ्या जागेत दारू पिण्यासाठी बोलावून घेतले होते. या मोकळ्या जागेत काही मुलांनी क्रिकेट खेळण्यासाठी बनवलेल्या धावपट्टीवर अंधारात तिघेजण दारू पित बसले होते. दारू पिण्याच्या वादातून संशयित सोहेल काझी व साबीर ऊर्फ सोहेल मुकादम या दोघांनी धारदार शस्त्राने समीर नदाफ याच्या छातीवर, पोटावर व डोक्याच्या पाठीमागे सपासप वार केले. जखमी अवस्थेत नदाफ जीव वाचविण्यासाठी कुपवाड एमआयडीसीकडे पळत सुटला. सावळी ते कुपवाड एमआयडीसी रस्त्यालगत असलेल्या एका कंपनीसमोर तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. ही घटना एका रखवालदाराने कुपवाड पोलिसांना सांगितली.

कुपवाड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमी समीर नदाफला मिरजेतील शासकीय रुग्णालयात दाखल केले, पण त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच सांगलीतील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक जयदीप कळेकर यांचे पथक संशयितांच्या शोधासाठी रवाना झाले. खून प्रकरणातील दोघे संशयित कुपवाड ते मिरज रस्त्यालगत असलेल्या बडे पीर दर्ग्याच्या परिसरात बसले आहेत, अशी माहिती हवालदार सागर लवटे, संदीप गुरव यांना मिळाली. त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन संशयितांना जेरबंद केले.

सोहेल काझी सराईत गुन्हेगार

संशयित सोहेल काझी हा पानपट्टी चालवतो. तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरुध्द कुपवाड पोलिस ठाण्यात जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. काही दिवसापूर्वी समीर हा काझीच्या पानपट्टीवर आला. मावा व सिगारेट घेऊन त्याचे पैसे न देताच निघून जात असताना सोहेल याने पैसे मागितले. यावेळी त्याने सोहेल याला दमदाटी करीत जिवे मारण्याची धमकी दिली. सोमवारी रात्रीही सोहेल व साबीर थांबले असता तो दारूसाठी पैसे मागू लागला. यावेळी संशयितांनी सावळी हद्दीत नेऊन त्याचा गेम केला.

समीर नदाफ मोक्कातील आरोपी

समीर नदाफ याच्यावर खुनासह आर्म अ‍ॅक्टचा गुन्हा दाखल होता. नऊ वर्षांपूर्वी एका खुनाच्या गुन्ह्यात म्हमद्या नदाफसह त्यालाही अटक झाली होती. समीर याच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली होती. मोक्काच्या गुन्ह्यातून तो जामिनावर बाहेर आला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT