सोयाबीन दरात घसरण; उत्पादकाचे मरण 
सांगली

Sangli News : सोयाबीन दरात घसरण; उत्पादकाचे मरण

भाव पाडण्याची परंपरा कायम : हमी भाव खरेदी केंद्रे सुरू करण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

विवेक दाभोळे

सांगली : गतवर्षी सोयाबीनचा दर चार ते साडेचार हजार रुपये प्रति क्विंटलच्या पुढे गेले नव्हते. यावेळी जगातील प्रमुख सोयाबीन उत्पादक देश अमेरिका आणि ब्राझीलमध्ये नैसर्गिक कारणांनी सोयाबीनचे उत्पादन घटेल, आणि त्यातून देशातील सोयाबीनला मागणी वाढेल आणि दरातदेखील वाढ होईल, अशी स्थिती असतानादेखील मात्र प्रत्यक्षात चित्र उलटेच राहिले. दर पडले. ऐन सुगीत भाव पाडण्याची परंपरा कायम राहिली असून याची दखल घेत शासनाने तातडीने हमी भाव खरेदी केंद्रे सुरू करण्याची मागणी शेतकरी करू लागला आहे.

जिल्ह्यात 42 हजार हेक्टरमध्येच सोयाबीन

जिल्ह्यात सन 2023-24 च्या खरीप हंगामात 24 हजार 500 हेक्टरक्षेत्रात सोयाबीन पीक होते. सन 24-25 मध्ये ते सोयाबीनचे क्षेत्र 48 हेक्टरच्या घरात पोहोचले होते. यावेळी मात्र सुरुवातीपासूनच खरिपाच्या मागे पावसाचे नष्टचर्य लागले आहे. मुळात सोयाबीनची अपेक्षित क्षेत्रावर पेरणीच होऊ शकली नव्हती. मेमधील पावसाने आगाप सोयाबीनचा टक्का कमी झाला. सुरू झालेला पाऊस तर आजअखेर सुरूच आहे. मात्र यातून कसेबसे उत्पादन झालेल्या सोयाबीनला चांगला भाव मिळू शकतो, अशी शेतकर्‍याला आशा होती. मात्र तसे झाले नाही. गत हंगामात सन 2024-25 खरीप हंगामासाठी 4892 रु. प्रतिक्विंटल असा हमी भाव होता. मात्र बाजारातील दर हा प्रतिक्विंटल 4,200 ते 4,300 रुपयांच्या घरात होता. आतादेखील असेच चित्र आहे. यावेळी 5 हजार 328 रु. प्रतिक्विंटल असा हमी भाव आहे. मात्र बाजारात व्यापार्‍यांकडून प्रतिक्विंटल 3 हजार 800 ते 4 हजार 300 रुपयांच्या घरात खरेदी होत आहे. याचा शेतकर्‍यांना मोठाच फटका बसला आहे.

हमी भावात वाढ, पण बळीराजाच्या पदरात मात्र मोठा भोपळा

केंद्र सरकार दरवर्षी सोयाबीनसाठी किमान आधारभूत किंमत जाहीर करते. त्यापेक्षा कमी किमतीने सोयाबीनची खरेदी करणे कायद्याला अपेक्षित नाही. सन 24-25 साठी हमीभाव 4,892 रुपये आहे. मात्र बाजारात खरेदी 4,200 ते 4,300 रुपयांनीच झाली. सन 23-24 साठी हमी भाव हा 4,600 रुपये होता, तर त्यावेळीदेखील 4,300 रुपयांनीच सोयाबीनची खरेदी झाली. त्या आधी सन 22-23 मध्ये हमी भाव हा 4,300 रुपये होता, तर खरेदी 3,900 रुपयांनीच झाली होती. सन 21-22 मध्ये 3,950 रुपयांचा हमी भाव होता, तर खरेदी होती 3,600 ते 3,700 रुपयांची. आता तर 5 हजार 328 रुपयांचा हमी भाव जाहीर आहे.

प्रत्यक्षात खरेदी मात्र 3,800 रु. ते 4,300 रुपयांच्यादरम्यानच होत आहे. वास्तविक पाहता प्रत्येक वर्षी हमी भावात वाढ होत गेली, पण प्रत्यक्षात व्यापार्‍यांकडून खरेदी ही हमी भावापेक्षा कमी दरानेच होत राहिली, मग हमी भाव जाहीर करून शेतकर्‍यांचा काय फायदा, असा सवाल सोयाबीन उत्पादक करू लागले आहेत. याकडे सरकार डोळेझाक का करते, असा सवाल शेतकरी करू लागला आहे.

सोयाबीन संपले : कवडीमोल दर

ऐन सोयाबीन काढणीच्या हंगामात मराठवाड्यात आणि विदर्भाच्या पश्चिम भागात गेल्या शंभर वर्षांत झाला नाही असा अभूतपूर्व पाऊस झाला. या पावसाने शेती अगदी खरवडून काढल्यासारखी वाहून गेली. मराठवाडा हाच खरा सोयाबीन उत्पादनाचा टापू आहे. मात्र येथेच पावसाने सोयाबीन वाहून गेले. यामुळे बाजारपेठेला सोयाबीन अत्यंत कमी प्रमाणात येणार हे सांगण्यासाठी कोणा तज्ज्ञांचीदेखील गरज उरलेली नाही, असे असताना मुळात बाजारात सोयाबीन कमी असतानादेखील सोयाबीनचे दर पडतात कसे, हा सवाल अनुत्तरितच राहतो. दरातील तेजी राहू दे किमान सोयाबीनला साधा किमान हमी भावदेखील मिळू शकला नाही. यातून शेतकर्‍यांची निसर्गाबरोबरच यंत्रणेनेदेखील परवड केली. परिणामी शेतकरी पुरता उद्ध्वस्त झाला आहे. मात्र शासन नावाच्या यंत्रणेला याबाबत ना खंत ना खेद! (उत्तरार्ध)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT