कुपवाड : हातनूर (ता. तासगाव) येथे सहा ऊसतोड कामगारांनी दोन मोरांची शिकार केली असल्याची माहिती वन विभागाच्या अधिकार्यांना मिळाली. वन विभागाचे फिरते पथक व अधिकार्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन संशयित सहा जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरोधात वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.
वामन लक्ष्मण जाधव (वय 36, रा. कुंभार्डा, ता. महाड, जि. रायगड), रत्नाकर अर्जुन पवार (39, रा. अंबवली, ता. महाड, जि. रायगड), किशोर काशीराम पवार (22, रा. सापेगाव, ता. महाड, जि. रायगड), सचिन बाळकृष्ण वाघमारे (23), सत्यवान बाळकृष्ण वाघमारे (21) नितीन बाळकृष्ण वाघमारे (20, तिघेही रा. चोचिंदे, ता. महाड, जि. रायगड) अशी संशयित ऊसतोड कामगारांची नावे आहेत. हातनूर (ता. तासगाव) येथे ऊसतोड कामगारांनी दोन मोरांची शिकार केली असल्याची माहिती तासगावच्या वनक्षेत्रपाल कल्पना पाटील यांना मिळाली. त्यानुसार उपवनसंरक्षक सागर गवते, सहायक वनसंरक्षक नवनाथ कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सावळजचे वनपाल सागर पताडे, पेडचे वनसंरक्षक सुनील पवार, वडगाव येथील वनरक्षक दीपाली सागावकर, वनरक्षक दत्तात्रय बोराडे, राजकुमार मोसलगी, प्रतीक मरडे यांच्या पथकाने छापा टाकला असता संशयित सहा ऊसतोड कामगारांनी मांस खाण्याच्या उद्देशाने दोन मोरांची शिकार केल्याचे आढळून आले.
पथकाने संशयितांना रंगेहात पकडले. त्यांच्याविरोधात वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. तपास सुरू आहे. जिल्ह्यात वन्यप्राण्यांची शिकार करताना कोणी आढळून आल्यास नागरिकांनी, शेतकर्यांनी जागरुक राहून वन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन अधिकार्यांनी केले आहे.