सांगली ः जिल्हा परिषदेच्या 61 गटांची आणि पंचायत समित्यांच्या 122 गणांची आरक्षण सोडत सोमवार, दि. 13 रोजी होणार आहे. गटांची आरक्षण सोडत जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11 वाजता होईल. तसेच गणांची सोडत तालुका पातळीवर होणार आहे. आरक्षण सोडतीबाबत ग्रामीण भागात तर्कवितर्क लावले जात आहेत. आरक्षण सोडत झाल्यानंतर ग्रामीण भागातील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. त्यामुळे इच्छुकांच्या नजरा या सोडतीकडे लागल्या आहेत.
जिल्हा परिषद, पंचायत समितीमधील पदाधिकार्यांचा कार्यकाल संपून सुमारे साडेतीन वर्षांचा कालावधी लोटला; मात्र विविध कारणांमुळे निवडणूक वेळेत झाली नाही. न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करण्याचे आदेश काही महिन्यांपूर्वी दिल्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणूक पूर्वतयारीला वेग आला. प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यास 14 जुलैपर्यंत मुदत देण्यात आली. त्यानंतर रचना प्रसिद्ध करून हरकती घेण्यात आल्या. जिल्हा परिषदेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर 16 आणि पंचायत समितीच्या गण रचनेवर 3, अशा एकूण 19 हरकती दाखल झाल्या आहेत. मात्र बावची व येलूर गट वगळता उर्वरित 59 गट जैसे थे राहिले. येलूर आणि बावची जिल्हा परिषद गटातील गावांत बदल झाला, तर पंचायत समितीच्या माडगुळे आणि विठलापूर गणातील गावांत बदल करण्यात आला. अंतिम प्रभाग रचनेनंतर इच्छुकांच्या नजरा आरक्षण सोडतीकडे लागल्या होत्या. काही दिवसांपूर्वी राज्य निवडणूक आयोगाने आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा परिषदेच्या 61 गटांसाठी दि. 13 ऑक्टोबरला आरक्षण सोडत होणार आहे. तसेच याचदिवशी प्रत्येक तालुक्यात तहसील कार्यालयात पंचायत समिती गणांसाठी आरक्षण काढले जाणार आहे. 14 ऑक्टोबरला जिल्हाधिकारी प्रारूप आरक्षणाची अधिसूचना जाहीर करतील. या आरक्षणावर 14 ते 17 ऑक्टोबरपर्यंत जिल्हाधिकारी यांच्याकडे हरकती दाखल करता येणार आहेत. 27 ऑक्टोबरला जिल्हाधिकारी हरकतीबाबतचा अहवाल विभागीय आयुक्तांना सादर करतील. विभागीय आयुक्त 31 ऑक्टोबरला अंतिम आरक्षण जाहीर करतील. 3 नोव्हेंबरला राजपत्रात अंतिम आरक्षण प्रसिद्धी होणार आहे.
पंचायत समितींच्या गणांची आरक्षण सोडत दि.13 रोजी सकाळी 11 वाजता तालुका स्तरावर काढण्यात येणार आहे. पंचायत समितीनिहाय एकूण गणांची संख्या आणि आरक्षण सोडतीचे ठिकाण अनुक्रमे असे ः आटपाडी ः 8 गण (पंचायत समितीचे सभागृह), जत ः 18 (तहसील कार्यालयातील तलाठी भवन), खानापूर ः 8 (मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील सभागृह), कडेगाव ः 8 ( तहसील कार्यालयातील सभागृह), तासगाव ः 12 (मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील शासकीय बहुउद्देशीय कक्ष), कवठेमहांकाळ ः 8 (पंचायत समितीमधील सभागृह), पलूस ः 8 (तहसील कार्यालयातील सभागृह), वाळवा ः 22 (लोकनेते राजारामबापू नाट्यगृह), शिराळा ः 8 (तहसील कार्यालय), मिरज ः 22 गण, (पंचायत समितीमधील सभागृह).