विटा नगराध्यक्षपदासाठी ओबीसी आरक्षण जाहीर  (Pudhari Photo)
सांगली

Vita Politics | विटा नगराध्यक्षपदासाठी यंदा नवओबीसी विरुद्ध ओबीसी असा संघर्ष रंगणार?

Sangli News | विटा नगरपालिकेची नगराध्यक्ष पदासाठीची आरक्षण सोडत जाहीर झाली आहे

पुढारी वृत्तसेवा

Vita Municipal Election

विजय लाळे

विटा : अखेर विटा पालिकेत पुढच्या पाच वर्षांसाठी नगराध्यक्षपदी नागरिकांचा मागास प्रवर्ग अर्थात ओबीसी महिला विराजमान होणार हे स्पष्ट झाले. मात्र त्यामुळे आता प्रत्यक्ष निवडणुकीत नवओबीसी विरुद्ध ओबीसी असा सामना रंगणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गेल्या काही काळापासून अतिशय उत्कंठा लागून राहिलेल्या विटा नगरपालिकेची नगराध्यक्ष पदासाठीची आरक्षण सोडत जाहीर झाली. यात पुढच्या पाच वर्षांसाठी नगराध्यक्षपदी ओबीसी महिला विराजमान होणार आहेत. मात्र त्यात मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण लढ्यानंतर ज्यांनी कुणबी दाखले काढलेले आहेत. ही सर्व मंडळी आता ओबीसी या प्रवर्गात आपसूकच समाविष्ट झाली आहेत. परिणामी विटा पालिकेसाठी ओबीसी विरुद्ध नव ओबीसी असा राजकीय संघर्ष पाहायला मिळणार ? अशी नवीनच गणितांची गृहीतके स्थानिक राजकीय पक्ष, गट आणि विटेकरांच्या डोक्यातून बाहेर पडत आहेत.

विट्याचे एकूण मतदान ५० हजाराच्या आत बाहेर आहे. यात मराठा समाजाचे प्राबल्य आहे. यानंतर देवांग समाजाचे १० ते ११ हजाराच्या आसपास संख्याबळ आहे. तसेच अनुसूचित जाती ६ ते ७ हजार आहेत, मुस्लिमांची एकूण संख्या ४ ते ४ हजार ५००, धनगर समाज आणि लिंगायत समाज त्या खालोखाल येतो. शिवाय नाभिक समाजही यंदा प्रथमच राजकीय क्षितिजावर आपल्या हक्काची दावेदारी मागत आहे. त्याकडे सर्वच राजकीय पक्ष आणि गटांना मात्र विट्यातल्या एकूणच राजकारण आणि समाजकारणावर ओबीसी समाजाचा मोठा पगडा आहे.

गेल्या ५० वर्षापासून विटा नगरपालिकेवर पाटील घराण्याची एकहात्ती सत्ता आहे. मात्र, गत दोन विधानसभेच्या निवडणुकांचा राजकिय कल पाहता शहरात आमदार बाबर गटाला यावेळी चांगली संधी असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे यंदा लढत तुल्यबळ होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. भाजपकडून माजी नगरसेवक अनिल बाबर यांच्या पत्नी देवता अनिल बाबर यांना शब्द दिला असल्याचे सांगण्यात येत आहे.

माजी नगरसेविका नेहा किशोर डोंबे याही इच्छुक आहेत. तर माजी उपनगराध्यक्ष प्रतिभा अविनाश चोथे, लता सुरेश मेटकरी याही प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत. तर माजी सभापती वैशाली प्रताप सुतार याही इच्छुक आहेत. तर बाबर गटाकडून अनिल यंत्रमाग ग्रुपच्या काजल संजय म्हेत्रे, वैभव म्हेत्रे यांच्या पत्नी विद्या वैभव म्हेत्रे, शिवाय उत्तमराव चोथे यांच्या स्नुषा दिपाली अविनाश चोथे, माजी नगरसेवक शिवाजीराव हारुगडे यांच्या स्नुषा भावना प्रणव हारगुडे, रुपाली मंथन मेटकरी आदींची नावे चर्चेत आहेत. दरम्यान, असे जरी असले तरी नगराध्यक्ष पदासाठीच्या उमेदवारांची चाचपणी अद्याप सुरू असून ऐनवेळी पाटील आणि बाबर गटाकडून तुल्यबळ उमेदवार रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.

सन १९९६ मध्ये विटा पालिका नगराध्यक्षपदी ओबीसी महिला प्रवर्गातून भागीरथी टेके यांनी नगराध्यक्षपद भूषविले होते. त्यानंतर तब्बल २९ वर्षानंतर ओबीसी समाजाच्या महिलेला विट्यात नगराध्यक्ष पदाची संधी मिळत आहे. दरम्यान, नगराध्यक्ष पद हे सर्वसाधारण खुले आरक्षण पडले असते. तर वैभव पाटील विरुद्ध अमोल बाबर, सर्वसाधारण महिला आरक्षण पडले असते तर प्रतिभा पाटील विरुद्ध शितल बाबर आणि अनुसुचित जातीचे आरक्षण पडले असते. तर प्रशांत कांबळे विरुद्ध संजय भिंगारदेवे अशा लढतींच्या चर्चा सुरू होत्या.

त्यातच भाजपचे नेते अनिल बाबर यांची ओबीसी पुरुष गटातून प्रमुख दावेदारी होती. परंतु महिला ओबीसी आरक्षण अनपेक्षित समोर आल्याने या प्रमुख उमेदवारांचा हिरमोड झाला आहे. तरीही आज विटा शहरात कुठल्या कुठल्या खुल्या प्रवर्गातील महिला उमेदवारांनी कुणबी दाखले काढून ओबीसीत समाविष्ट झालेत याची चर्चा सुरू होती. त्यामुळे या नवओबीसींनी ऐनवेळी दावेदारी केलीच तर काही वजनदार उमेदवारांची शक्यताही नाकारता येत नाही.

मात्र, शहरातील देवांग आणि ओबीसी समाजाचे प्राबल्य, मतदारसंख्या लक्षात घेता त्यांना डावलणे तितके सोपे नाही. एकूणच महिला ओबीसी आरक्षणामुळे अपेक्षित धरलेली समीकरणे झपाट्याने बदललेली आहेत. परंतु, यंदा विटा पालिका निवडणुकीत ओबीसी विरुद्ध नवोदय नवीन संघर्ष पाहायला मिळणार का? अशी चर्चा विटेकरांमध्ये रंगली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT