सांगली ः पहाटेपासून वाचकांना वृत्तपत्र उपलब्ध करून वाचकांचा चहा अधिक गोड करण्याचे काम वृत्तपत्र विक्रेते करतात. शासनदरबारी उपलब्ध असणारे विविध लाभ मुलांना मिळवून द्या. मुलांना चांगले घडवण्यासाठी व चांगले अधिकारी बनवण्यासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत, त्यांचा लाभ घ्या. वृत्तपत्र विक्रेत्यांच्या मुलांना गरज पडेल तिथे मी तुमच्यासोबत असेन, असे आश्वासन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिले.
महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेशी संलग्न सांगली जिल्हा वृत्तपत्र विक्रेता एजंट असोसिएशनच्यावतीने सांगलीत वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सहायक कामगार आयुक्त मुजमल मुजावर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, पहाटेच्या वेळी रस्त्यावर फक्त वृत्तपत्र विक्रेते दिसत असतात. समाजजागृतीचे साहित्य, विविध माहिती पोहोचवण्याचे काम आपण करता. एखाद्या दिवशी पेपरला सुटी असेल, तर अस्वस्थ वाटते. वृत्तपत्र विक्री हा अतिशय सन्मानाचा व्यवसाय आहे. यामधून वृत्तपत्र विक्रेते स्वतः घडले, तसेच आपलं कुटुंबही घडवत आहेत, याचा अभिमान वाटतो. कामगार आयुक्त मुजमल मुजावर म्हणाले, वृत्तपत्र विक्री हा अतिशय कष्टाचा व्यवसाय आहे. थंडी, वारा व पाऊस याची तमा न बाळगता अखंडपणे हे काम करावे लागते व त्यामध्ये नियमितपणा ठेवणे हे सोपे नाही, हे मी अनुभवले आहे. मात्र आपण ते नियमित करत आहात. राज्य संघटनेचे सरचिटणीस विकास सूर्यवंशी व माजी कार्यकारिणी सदस्य मारुती नवलाई यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रशांत जगताप, शिवाजी जाधव, चंद्रकांत जोशी, धनंजय राजहंस, हनुमंत जाधव यांच्यासह वृत्तपत्र विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. दत्तात्रय सरगर यांनी स्वागत केले, सचिन चोपडे यांनी प्रास्ताविक केले, तर विशाल रासनकर यांनी आभार मानले. संजय कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.
दीपक वाघमारे, नागेश कोरे, कृष्णा जामदार, नारायण माळी, दरिबा बंडगर, प्रदीप आजगावकर, श्रीकांत दुधाळ, बाळासाहेब पोरे, गणेश कटगी, दीपक सूर्यवंशी, प्रताप दुधारे, प्रकाश कुंभार, सचिन माळी, प्रकाश उन्हाळे, बजरंग यमगर, अतुल रूपनर, सुरेश कांबळे, आर. एस. माने, नीलेश कोष्टी, दादासोा गुरव, बाळासाहेब पाटील, प्रशांत साळुंखे, बसाप्पा पट्टणशेट्टी, बंदेनवाज मुल्ला, सुरेश गायकवाड, बंडू आष्टेकर, यशवंत जाधव, महेश मुजूमदार, बजरंग कोळी, सुनील कट्याप्पा, संजय कांबळे, अमोल कोरे, कैलास सूर्यवंशी, दत्ता चव्हाण, विशाल पवार, श्रीपती रासनकर उपस्थित होते.
आयुष्यातील काही काळ वृत्तपत्र विक्रेता म्हणून काम केलेल्या, मात्र त्यानंतर नोकरीच्या ठिकाणी स्थिरस्थावर होत आयुष्यात चांगली प्रगती केलेल्या वृत्तपत्र क्षेत्रातील अनुभवसंपन्न व्यक्तिमत्त्वांचा यावेळी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये विटा येथे वृत्तपत्र वितरणातील तिसरी पिढी म्हणून चांगले काम करणारे वृत्तपत्र एजंट विनय भंडारे, पृथ्वीराज पवार, वृत्तपत्र विक्रीबरोबर कॉपीचा व्यवसाय सुरू केलेल्या सचिन आजूरकर, संघटना कामात सहभाग असणारे सचिन चोपडे, बाळासाहेब पोरे यांना जिल्हाधिकारी काकडे यांच्याहस्ते पुरस्कार दिला.