पलूसमध्ये नगराध्यक्ष पदावरून जोरदार चढाओढ 
सांगली

Sangli News : पलूसमध्ये नगराध्यक्ष पदावरून जोरदार चढाओढ

‘महायुती’बाबतचा निर्णय गुलदस्त्यात ः तिरंगी लढत ठरण्याची चिन्हे

पुढारी वृत्तसेवा

तुकाराम धायगुडे

पलूस : पलूस नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासह सर्व दहा प्रभागांचे आरक्षण निश्चित झाले आहे. यानंतर उमेदवार निवडीसाठी चुरस वाढली आहे. यावेळी ही निवडणूक काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी (अजित पवार गट-बापूसाहेब येसुगडे गट) विरुद्ध भाजप अशी तिरंगी होणार असल्याचे संकेत आहेत.

भाजपकडून ही निवडणूक नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासह मित्र पक्षांना सोबत घेऊन लढविण्यात येईल, असे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. मात्र, राष्ट्रवादी (येसुगडे गट) व भाजप यांच्यामध्ये नगराध्यक्षपदावरून मतभेद निर्माण झाल्याने युतीबाबतचा निर्णय अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यामुळे युती न झाल्यास ही निवडणूक तिरंगी होईल, असे स्पष्ट संकेत आहेत.पलूस शहरातील 10 प्रभागांतील 20 जागांसाठी निवडणूक होणार आहे. 2016 च्या निवडणुकीत काँग्रेसला नगराध्यक्षपदासह 12 जागा, स्वाभिमानी विकास आघाडीला 4 जागा मिळाल्या होत्या, तर भाजपाला फक्त 1 जागेवर समाधान मानावे लागले होते. राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार अरुण लाड यांनीही मोठी ताकद पणाला लावली होती, मात्र नगरपंचायतीमध्ये तत्कालीन एकसंध असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला खातेही उघडता आले नव्हते.

अलीकडेच क्रांती साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पक्षप्रवेशावेळीच त्यांनी राज्यपातळीवरील नेत्यांच्या उपस्थित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपचा झेंडा फडकविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यामुळे नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने शहरातील भाजप कार्यकर्त्यांना आणखी बळ मिळणार, असा अंदाज वर्तविला जात आहे. शरद लाड व संग्राम देशमुख हे दोन्ही नेते मित्र पक्षांना एकत्रित घेऊन ‘महायुती’च्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु माजी आमदार पृथ्वीराज देशमुख मात्र भाजपच्या अधिकृत चिन्हावरच निवडणूक लढविण्याबाबत ठाम असल्याने, ‘महायुती’मधील अंतर्गत संघर्ष वाढला आहे.

दरम्यान, शुक्रवार, दि. 31 ऑक्टोबररोजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पलूस येथे भाजपचा पक्षप्रवेश सोहळा होणार असून, त्यानंतर नगरपरिषद निवडणुकीसंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक अपेक्षित आहे. दरम्यान, पलूस शहरात भाजपचे दोन वेगळे गट दिसू लागले आहेत. एक पृथ्वीराज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली, तर दुसरा संग्राम देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मोर्चेबांधणी करताना दिसत आहे. दरम्यान, काँग्रेसकडून नगराध्यक्ष पदासाठी दिवंगत नेते अमरसिंह इनामदार यांच्या पत्नी विद्युलता इनामदार व सुहास पुदाले यांच्या पत्नी संजीवनी पुदाले या प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत.

आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्ष लवकरच उमेदवार निश्चित करणार आहे. राष्ट्रवादीकडून संग्राम उद्योग समूहाच्या कुटुंब प्रमुख जोत्स्ना येसुगडे, तर भाजपकडून केदार उद्योग समूहाचे अध्यक्ष सर्जेराव नलावडे यांच्या पत्नी छाया नलावडे, स्नुषा सोनाली नलावडे यांच्या उमेदवारीबाबत चर्चा सुरू आहे. काँग्रेसची जबाबदारी वैभव पुदाले, गणपतराव पुदाले, सुहास पुदाले, भरत इनामदार, विशाल दळवी यांच्याकडे, तर राष्ट्रवादी (अजित पवार गट) म्हणून निवडणूक लढवणार्‍या स्वाभिमानी विकास आघाडीची जबाबदारी नीलेश येसुगडे यांच्याकडे आहे. भाजपकडून सर्जेराव नलावडे, रामानंद पाटील, दिगंबर पाटील, संजय येसुगडे यांच्यावर जबाबदारी आहे. दरम्यान, शिवसेना (शिंदे गट) तालुका प्रमुख प्रशांत लेंगरे यांनी सर्व जागा ताकदीने लढविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. एकंदरीत निवडणुकीची प्रत्यक्ष रणधुमाळी अद्याप लांब असली तरी सर्वच पक्षांनी आतापासूनच जोरदार तयारी सुरू केल्याचे चित्र आहे.

ज्येष्ठांची आठवण

गत निवडणुकीचा विचार करता, ती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंतराव पुदाले, खाशाबा दळवी व स्वाभिमानी विकास आघाडीचे बापूसाहेब येसुगडे तसेच माजी सभापती अमरसिंह इनामदार यांच्या नेतृत्वाखाली लढली गेली. ही मंडळी आता हयात नाहीत. त्यांच्या पश्चात होणारी पहिलीच लढत ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT