सांगली : महायुती सरकारच्या फसव्या पॅकेजविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्यावतीने शुक्रवारी निषेधात्मक काळी दिवाळी साजरी करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मारत धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी उपजिल्हाधिकार्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
आंदोलनात जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, शेखर माने, वैभव शिंदे, टी. व्ही. पाटील, आनंदराव नलवडे, हरिदास पाटील, राहुल यमगर आदी पदाधिकारी सहभागी झाले होते. निवेदनात म्हटले आहे की, राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कधी नव्हे, असे नैसर्गिक संकट आल्यामुळे राज्यातील बळीराजा पूर्णतः उद्ध्वस्त झाला आहे. झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली नाशिक येथे भव्य मोर्चा काढून, राज्यात शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी करावी, ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत करावी, अशी मागणी सरकारकडे करण्यात आली होती. मात्र महायुती सरकारने घाईघाईत 36 हजार 500 कोटींची फसवी मदत जाहीर केली आहे. सरकारने बळीराजाच्या डोळ्यात धूळफेक करून ही फसवी मदत देऊ केली आहे. त्याचा आम्ही निषेध करीत आहोत.
याबाबत आमच्या पक्षामार्फत मौन धारण करून काळी दिवाळी साजरी करीत आहोत. शासनाने ही फसवी मदत करण्यापेक्षा तातडीने सरसकट कर्जमाफी करावी, ओला दुष्काळ जाहीर करून शेतकर्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत करावी. या आमच्या भावना तातडीने वरिष्ठांकडे पाठवून समस्त शेतकरी वर्गाला न्याय द्यावा.